अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या कामावर रुजू झाले आहेत. कामावर रूजू होताच त्यांनी पुन्हा एकदा चीनला कोरोना प्रकरणातील निष्काळजीपणामुळे झालेल्या परिणामांचा, सामना करावा लागेल असा इशारा दिला आहे. ट्रम्प यांना कोविडची (covid-19) लागण होण्याआधी आणि नंतरही White Houseमध्ये काम करणारे अनेक लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या नॅन्सी पॅलोसी यांनी White House वर टीका केली आहे.
नॅन्सी पेलोसी यांनी मीडियातील एका कार्यक्रमात White House बद्दल बोलताना सांगितलं की, त्या ठिकाणाच्या आजूबाजूला फिरकण्याची सुद्धा त्यांची इच्छा नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही जागा सध्यातरी अमेरिकेतील सर्वात धोकादायक जागांपैकी एक आहे. ज्यावेळी ट्रम्प यांच्या व्यतिरिक्त White Houseमध्ये काम करणाऱ्या 19 जणांना कोरोनाची लागण झाली, त्यानंतर आरोग्याविषयी आपलं मत मांडताना नॅन्सी यांनी ही जागा सध्या अतिशय धोकादायक आहे, असं सांगितलं होतं.
तसंच सोशल डिस्टन्सिंगही कोरोनाला रोखण्यासाठीच्या उपायांपैकी एक आहे. सीडीसीच्या नियमांनुसार, कुठल्याही कार्यक्रमात 50 पेक्षा अधिक लोक उपस्थित राहता कामा नये. त्यांनी एकमेकांपासून 6 फूटांपर्यंतचं अंतर पाळावं. मात्र, 26 सप्टेंबरला White Houseमध्ये झालेल्या कार्यक्रमात अनेक लोकं उपस्थित होते. उपस्थितांपैकी अनेकांनी मास्कही घातलं नव्हतं.
एकमेकांच्या संपर्कात न येणं हा देखील कोरोनासाठीचा महत्त्वाचा नियम आहे. परंतु White Houseमध्ये या नियमांचं देखील उल्लंघन करण्यात आलं. सीडीसीने, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी लगेचच आपली चाचणी करून घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं. मात्र, ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी जो बायडेन (Joe Biden) यांनी कार्यक्रमाच्या वेळी ट्रम्प आणि मी संपर्कात आल्याचं सांगितलं. त्यानंतर ट्रम्प यांना कोरोना झाल्याची माहिती मिळाली, पण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झालं नाही. ट्रम्प यांनी ट्विट केल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचं मला कळालं, असंही ते म्हणाले.