

29 जणांना मृत्यूच्या कवेत घेऊन ८०० फूट खोल दरीत झेपावलेली बस अखेर बाहेर काढण्यात आलीये. सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बसला बाहेर काढण्यात यश आलंय.


28 जुलै 2018 रोजी दापोली कृषी विद्यापीठांच्या प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस पोलादपूर आंबेनळी घाटातील ८०० फूट खोल दरीत कोसळली होती.


आज सकाळी 7 वाजल्यापासून महाबळेश्वर ट्रेकर्सच्या च्या मदतीने बस काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती.


बस बाहेर काढण्यासाठी मोठी क्रेन मागवण्यात आली होती. या कामासाठी महाबळेश्वरकडे जाणारा मार्ग दुपारपर्यंत बंद करण्यात आलाय.


महाबळेश्वर ट्रेकर्स दरीत उतरून त्यांनी बसला दोरखंडाने बांधले त्यानंतर ही बस बाहेर काढण्यात आली.


ज्या दिवशी बस दरीत कोसळली होती त्यावेळी मृतदेह बाहेर काढण्यासाठीही महाबळेश्वर ट्रेकर्सचे टीम घटनास्थळी पोहोचली होती. त्यांच्या या साहसी कामगिरीबद्दल सत्कारही करण्यात आला होता.


बस दरीत अडकल्यामुळे पोलिसांचा तपास पूर्ण होत नव्हता तसंच एस टी परिवहन खात्याचा तपास अपूर्ण राहिला होता.


आता बस दरीतून काढण्यात आल्याने परिवहन महामंडळाच्या अधिका-यांनी घटनास्थळी पाहणी केली. या पाहणीतून अपघात कशामुळे झाला या तपासातून पुढे येणार आहे.


बस जेव्हा दरीतून बाहेर काढण्यात आली तेव्हा या बसचा फक्त सांगाडा बाहेर आला. बसचे छत पूर्णपणे निखळले होते. बसची कंडक्टरची केबिन आणि मागचा भाग पूर्णपणे तुटलाय.