

सर्वात लोकप्रिय असलेलं मेसेंजर अॅप व्हॉटसअॅपने एक नवीन फीचर लॉन्च केलं आहे. या फीचरमुळे तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करू शकणार नाही.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ही सूचना केली होती. त्यानंतर हा बदल करण्यात आला आहे.यासाठी व्हॉटसअॅपने प्रायव्हसी सेटिंगमध्ये नवा पर्याय दिला आहे. याचा वापर करून कोण तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करू शकतो हे ठरवू शकता.


आता व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये अॅड करण्यासाठी इनव्हाइट सिस्टिम सुरू केली आहे. यातून युजरला ग्रुपमध्ये अॅड व्हायचे की नाही ते ठरवण्याचा पर्याय मिळतो. यामुळे नको असलेले ग्रुप आणि भरमसाठ मेसेजच्या त्रासातून युजरची सुटका होणार आहे.


ग्रुपमध्ये अॅड होण्यासाठी एखाद्याने विनंती पाठवली तर त्यावर युजरला हो किंवा नाही ते निवडावे लागेल. त्यानंतरच युजर ग्रुपमध्ये अॅड होऊ शकतो.


ग्रुपमध्ये अॅड होण्याची विनंती नेहमीच्या मेसेजप्रमाणे पाठवली जाणार आहे. ही विनंती स्वीकारण्यासाठी तीन दिवसाची मुदत असेल. तीन दिवसानंतर त्या लिंकवरून ग्रुपमध्ये अॅड होता येत नाही. तसेच तुम्हाला ज्या ग्रुपमध्ये अॅड केले जाणार आहे त्यात कोण आहेत याचीही माहिती तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड़ होण्याआधी समजणार आहे.


व्हॉटसअॅपच्या या फीचरचा वापर करण्यासाठी युजरला Settings मध्ये जावे लागेल. त्यानंतर Account > Privacy पर्याय निवडा. त्यामध्ये Groups या पर्यायावर क्लिक केल्यानंतर Nobody, My Contacts आणि Everyone असे पर्याय दिसतील. यापैकी एक पर्याय तुम्ही निवडू शकता.