

काही दिवसांपूर्वी हॉलिवूड सुपरस्टार विल स्मिथ भारत दौऱ्यावर आला होता. यादरम्यान, त्याने हरिद्वारसह अनेक धार्मिक स्थळांना भेट दिली.


विल भारतात येऊन बराच काळ लोटला असला तरी गेल्या काही दिवसांपासून त्याचे हेच फोटो व्हायरल होत आहेत. एका फोटोमध्ये विल देवाच्या समोर एकाग्रतेने ध्यान करताना दिसत आहे.


या फोटोला कॅप्शन देताना म्हटले की, ‘माझी आजी नेहमी सांगायची की अनुभवातून देव शिकवत असतो. भारत दौऱ्यावर असताना यात्रा आणि रंगांचा अनुभव करताना मला माझ्यातली कला आणि जगाच्या सच्चेपणाबद्दल अनेक गोष्टी नव्याने कळल्या.’ या फोटोला आतापर्यंत १४ लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.


विशेष म्हणजे हे पहिल्यांदा नाही जेव्हा विलने भारताबद्दल प्रेम व्यक्त केलं. याआधी त्याने बॉलिवूडमध्ये काम करण्याचा आणि रिक्षा चालवण्याचा अनुभव शेअर केला होता.


विलने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता ज्यात तो रिक्षाचा आनंद घेताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, ‘जेव्हा तुम्ही भारत दौऱ्यावर असता, तेव्हा तिथे पोहोचण्याचा फक्त एकच मार्ग आहे. विल स्मिथच्या बकेट लिस्टमध्ये विलची ही टुक टुक बॉलिवूडकडे वळली.’


विशेष म्हणजे करण जोहरने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. यात विल स्मिथ ‘राधा तेरी चुनरी’ गाण्यावर थिरकताना दिसतो. मजेशीर गोष्ट म्हणजे या गाण्यात टायगर श्रॉफ, अनन्या पांडे, तारा सुतारिया आणि पुनीत मल्होत्राही विलसोबत नाचताना दिसत आहेत.