

सलमान खान सध्या त्याचा आगामी भारत सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. रिपोर्ट्सनुसार सिनेमाच्या चित्रीकरणावेळी, कतरिनाला दुखापत झाली. दरम्यान, भारत सिनेमा विषयी पाकिस्तानातून एक अशी बातमी समोर आली आहे की पाकिस्तानातील सलमानचे चाहते निराश होतील.


सलमानचे चाहते फक्त भारतातच आहेत असं नाही, पाकिस्तानातही त्याचे मोठ्या संख्येने चाहते आहेत. सलमानचा कोणताही सिनेमा प्रदर्शित होतो तेव्हा पाकिस्तानातही त्याला मोठी मागणी असते.


लवकरच सलमानचा भारत येत्या ईदच्या मुहूर्तावर ५ जूनला प्रदर्शित होणार आहे. याचवेळी पाकिस्तानचा सुपरस्टार फवाद खान याचा दी लेजेंड ऑफ मौला जट्ट हा सिनेमाही प्रदर्शित होत आहे.


हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. यामुळे सिनेमागृहात प्रेक्षक येतील या विचारांनी पाकिस्तान डिस्ट्रीब्यूटर्सही आनंदी होते. मात्र आता असं काहीही होणार नाही. पाकिस्तान मंत्रालयाने एक फर्मान काढलं आहे. यात सलमानचा भारत सिनेमा ईदच्या काळात पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.


सिनेब्लिट्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग ऑफ पाकिस्तानने स्पष्ट केले होते की, कोणताही भारतीय सिनेमा ईदच्या दोन दिवस आधी आणि ईदच्या दोन आठवड्यांमध्ये प्रदर्शित होणार नाही.


भारतीय सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित झाल्यावर त्याचा मोठा फटका पाकिस्तानी सिनेमांना बसतो. बॉलिवूडमुळे फार कमी लोक पाकिस्तानी सिनेमे पाहतात.


सलमानचा रेस ३ सिनेमा भारतात ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. मात्र पाकिस्तानात प्रदर्शित करण्यात आला नव्हता. यावेळी भारत सिनेमासोबतही असेच काहीसे होणार आहे.