

अद्वैत मेहता,20 आॅक्टोबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषणातली फटकेबाजी सर्वश्रूत आहे. त्यांचा रांगडा स्वभाव पत्रकार आणि तमाम कार्यकर्त्यांना चांगलाच परिचित आहे. पण राज ठाकरे यांच्यात साधेपणा पाहण्यास मिळालाय़.


राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे मेळघाटातील दुर्गम भागातील गावांना भेट दिली.


मैत्री संस्थेच्या विविध प्रकल्पना भेट दिल्यावर दुपारी रुईपठार ह्या गावी सेलूकर कुटुंबियांच्या घरी राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जेवण केलं.


चिलाटीपासून चार किमी अंतरावरील रुईपठार गावातील नारायण छोटे सेलूकर यांच्या घरी राज ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दुपारचे जेवण घेतले. सेलूकर कुटुंबातील महिलांनी मक्याची भाकर, राजगिरा पाल्याची भाजी, मसूर आमटी, कुठकी म्हणजे स्थानिक लाल भात आणि गोली या गोड्या पाण्यातील माशाचे कालवण असा जेवणाचा बेत आखला होता.


"राज ठाकरे यांनी आमच्या गावाला आणि घराला भेट दिल्यामुळे खूप आनंद झाला", अशा शब्दात सेलूकर कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


चिलाटी गाव आणि आसपासच्या भागात, माझे सहकारी अनिल शिदोरे आणि त्यांचे सहकारी 'मैत्री' ह्या संस्थेतर्फे ह्या परिसरातल्या कुपोषणाच्या प्रश्नावर आणि ग्रामविकासावर काम करत आहेत असं राज ठाकरे यांनी टि्वट करून सांगितलं.