

लोकसभा निडणुकीनंतर बिहारमध्ये राजकीय युद्धाला सुरूवात झालीय. चारा घोटाळ्यात दोषी आढळल्याने लालूप्रसाद यादव रांचीच्या जेलमध्ये आहे. मात्र ते आजारी असल्याने हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तिथूनच ते राजकारण करत असल्याचा आरोप खुद्द मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीच केलाय. त्यानंतर प्रशासन जागं झालं असून त्यांनी दिवसातून दोन वेळा लालूंच्या खोलीची झडती घेतली आहे.


लालूंचा अजुनही करिष्मा असल्याने जेलमध्येही त्याची बडदास्त ठेवली जाते असा आरोप होतोय. सध्या निवडणुकांचं वातावरण असल्याने आपल्या पक्षाचं धोरण ते जेलमधूनच ठरवतात असाही आरोप होतोय. पोलिसांनी त्यांच्या खोलीची झडती घेतली मात्र त्यात काहीही आक्षेपार्ह आढळून आलेलं नाही.


नितीश कुमार यांनी न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत लालू प्रसाद हे जेलमध्ये फोनचा वापर करतात असा आरोप केला होता. त्यानंतर लालू प्रसाद यांची सुरक्षा कडक करण्यात आलीय. त्यांच्यासोबत दोन लोकांना राहण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. एक जण त्यांना जेवण बनवून देतो तर दुसरा त्यांच्या औषधोपचाराची काळजी घेतो. त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेसाठी 25 जवान तैनात आहेत.


लालू प्रसाद यादव यांच्यावर सध्या रिम्समध्ये उपचार सुरू असून तिथल्या एका वॉर्डमध्येच त्यांना ठेवण्यात आलं आहे.


नितीश कुमार यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या खोलीची झडती घेण्यात आली आहे. त्याचबरोबर खोलीबाहेर स्कॅनरही बसविण्यात आलं आहे. त्यांच्या सेवेसाठी जी माणसं आहेत त्यांचीही कसून तपासणी केली जात आहे.