

अगदी काही दिवसांवर लोकसभा निवडणुका आल्या आहेत. यामुळे देशभरात फक्त निवडणुकांच्या चर्चा होताना दिसत आहेत.


दरम्यान, मनोरंजन क्षेत्रातही राजकीय वारे वाहताना दिसत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत अनेक स्टार सेलिब्रिटी राजकारणात स्वतःचं नाणं वाजवून पाहण्याच्या तयारीत आहेत.


एकीकडे सोशल मीडियावर सलमान खान आणि सनी लिओनी राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चा आहेत. तर दुसरीकडे अनेक कलाकारांनी यात उडीही मारली आहे. आम्ही तुम्हाला अशाच सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत जे लोकसभा निवडणूकीतून राजकारणात स्वतःचं नशिब आजमावणार आहेत.


सर्वांची आवडती टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे काँग्रेसकडून उभी राहणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने पत्रकार परिषद घेऊन याबद्दल अधिकृत घोषणा केली होती.


शिल्पाच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनेत्री अर्शी खाननेही राहुल गांधींना पाठिंबा देण्याचं निश्चित केलं आहे. अर्शीने महाराष्ट्र युनिटची उपाध्यक्ष म्हणून पक्षात प्रवेश केला आहे.


प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि मॉडेल नुसरत जहांनेही राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तिने राज चक्रवर्कीसोबत शोत्रु सिनेमातून पदार्पण केलं होतं. यानंतर तिने खोका ४२० सिनेमातही काम केलं. ममता बॅनर्जी यांनी बांगलादेश सीमेच्या नजीक असलेल्या बशीरहाट येथून टॉलिवूड स्टार नुसरत जहांला सीट दिली आहे.


अजून एक बंगाली सुपरहिट अभिनेत्री मिमी चक्रवर्तीही निवडणुकांच्या लढाईत मैदानात उतरणार आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला मिमीने समर्थन दिलं आहे. दीदींनी जादवपुर येथील सीट मिमीला दिली आहे.


समाजसेवक आणि अभिनेते प्रकाश राजही राजकारणात सक्रीय झाले आहे. त्यांनी १ जानेवारीलाच याबद्दल सांगितले होते. ते बंगळुरू सेंट्रलकडून स्वतंत्र मतदान लढवणार आहेत.