

देशात सध्या गाजत आहे ते केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरुद्ध पंजाब, हरियाणामधील शेतकऱ्यांनी पुकारालेलं आंदोलन. दिल्लीच्या सीमेवर हे आंदोलन सुरू आहे. हजारोंच्या संख्येनं शेतकरी इथं गेल्या अनेक दिवसांपासून ठिय्या देऊन बसले आहेत. शेतकरी शिष्टमंडळाच्या सरकारबरोबर चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत, पण अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, हे शेतकरी आंदोलन स्थळी पिझ्झा, बिर्याणीसह गोडधोडाचा आनंद घेत असून, त्याबाबत रोज नवनवे किस्से, फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर येत आहेत. या शाही आंदोलनाची देशभर चर्चा होत आहे. तर या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी देशातूनच नव्हे तर जगभरातून मदतीचा ओघ येत आहे. आता या शेतकऱ्यांना लाडू, जिलेबी, शेव असे खाद्यपदार्थ पुरवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग 9 वरील गावांनी कंबर कसली असून, गावागावात अस्सल तुपात हे पदार्थ बनवण्याचे काम सुरू आहे.


आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी देशी तुपातले बुंदीचे लाडू करण्याचे काम सुरू असल्याचे या फोटोत दिसत आहे.फतेहबाद गावाजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 9 वरील गावांमध्ये देशी तुपातले लाडू, जिलेबी, शेव तयार करण्यात येत असून, ड्रायफ्रुटसही मोठ्या प्रमाणात पाठवण्यात येत आहेत.


मोठमोठ्या कढयांमध्ये शुद्ध तुपात ही पक्वान्ने करण्यात येत असल्याचं या फोटोतून दिसतंय. गावांमध्ये ठिकठिकाणी हे पदार्थ बनवण्याचे काम अगदी नियोजनबद्धरीत्या सुरू आहे.


या फोटोत किती मोठ्या प्रमाणात हे काम सुरू आहे, याची झलक दिसते. आकावली गावातील मोहन गढवाल यांनी सांगितलं की अत्यंत उत्साहात गावकरी या कामात सहभागी झाले असून, हे आंदोलन कितीही काळ चालो, शेतकऱ्यांना कोणतीही कमतरता भासू न देण्याची जबाबदारी आता या गावांनी घेतली आहे. जोपर्यंत सरकार कायदे परत घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवायचं अशी जिद्द या लोकांनी ठेवली आहे.


या फोटोंमध्ये किती झपाट्यानं हे काम सुरू असल्याचं दिसतं. इथं, बुंदीचे लाडू बनवण्याचा पुढचा टप्पा सुरू असलेला दिसत आहे. हरियाणातील ही गावं असून, हरियाणा हा पंजाबचा छोटा भाऊ आहे. त्यामुळं आंदोलनात सहभागी झालेल्या पंजाबमधील शेतकऱ्यांना कोणतीही अडचण भासू द्यायची नाही असा निश्चय या गावांनी केला आहे.


आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत, असा संदेश जणू हे लोक या कामातून देत आहेत. त्यांचा निश्चय त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. दोन वर्षे आंदोलन चाललं तरी हरकत नाही. त्यांना काहीही कमी पडणार नाही. गावकरी आळीपाळीनं धान्य, जेवण, खाद्यपदार्थ आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पोहोचवत आहेत. यासाठी गावकऱ्यांनी वेळापत्रक बनवले असून, त्यानुसार प्रत्येकजण सेवा देत आहे.