20 व्या शतकाच्या सुरुवातीला बंगालमध्ये राष्ट्रीय आंदोलनांनी जोर धरल्यामुळे ब्रिटिश साम्राज्यावर दबाव वाढला होता. ब्रिटिशांनी बंगालच्या विभाजनाची नवीन चाल खेळली. ब्रिटिशांच्या या चालीला अनेक नेत्यांनी विरोध केला. यामध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आघाडीवर होते. तोडा फोडा आणि झोडा या तत्त्वावर राज्य करणाऱ्या लॉर्ड कर्झनने मुस्लिम नेत्यांशी बोलणी करून अखेर 1905 मध्ये बंगालचं विभाजन केलं.
या विभाजनाच्या आधी श्रावण महिन्यात हिंदूंचा रक्षाबंधनाचा सण येत होता. या वेळी रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिशांच्या विरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलं. एकमेकांविषयी सदभाव आणि रक्षा करण्याच्या या पवित्र दिवशी कोलकाता, ढाका आणि सिल्हेटमधील अनेक हिंदू -मुस्लिम नागरिकांनी रस्त्यावर येत ब्रिटिशांना विरोध करत एकमेकांना राखी बांधली होती.
ब्रिटिशांनी 16 ऑक्टोबरला विभाजन जाहीर केल्यानंतर टागोर यांनी गंगा नदीत उडी मारत आंदोलनाला सुरुवात केली. त्यांनी आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर त्यांच्यामागे जनता चालू लागली. रस्त्यात जो व्यक्ती दिसेल त्याला ते राखी बांधत होते. तसेच मशिदीच्या आतमध्ये मौलवींना राखी बांधण्यास गेले असता परिस्थिती हाताबाहेर जाते की काय असं वाटू लागलं होतं. पण त्यांनी देखील काहीही विरोध न करता राखी बांधून घेतली असा उल्लेख या पुस्तकात आहे.
ब्रिटिशांनी बंगालच्या विभाजनाचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातून त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. आग्रा आणि सुरतमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं करण्यात आली होती. तसेच काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात ब्रिटिश सरकारच्या या निर्णयाविरुद्ध ठराव संमत करण्यात आला. काँग्रेसचे नेते गोपाळ कृष्ण गोखले यांनी या विरोधात जोरदार भाषण केल्याने ब्रिटिश सरकारवरील दबाव वाढला होता.