

अमेझॉनचे सीईओ जेफ बेजॉस त्यांच्या घटस्फोटामुळे बरेच चर्चेत आले होते. आता त्यांनी नॅशनल इन्क्वायरर टॅब्लॉइडवर ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप केला. बेजॉस यांनी म्हटल आहे की, नॅशनल इन्क्वायररने त्यांचा आणि टीव्ही अँकर लॉरेन सांचेजचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. तसा धमकीचा मेलही पाठवला असल्याचे बेजॉस यांनी केलेल्या दाव्यात म्हटले आहे.


या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून नॅशनल इन्क्वायररला ते फोटो कसे मिळाले याचा शोध घेत आहोत असं बेजॉसनं म्हटलं आहे. आता मॅगझिनचे प्रकाशक मी चौकशी बंद करावी यासाठी धडपडत आहेत आणि त्यासाठी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटले.


माझा घटस्फोट आणि त्यानंतर सांचेजसोबतच्या नात्याबद्दल जे काही प्रसिद्ध झालं त्यात कोणताच राजकिय उद्देश नव्हता असं मी जाहीरपणे बोलावं असं नॅशनल इन्क्वायररच्या प्रकाशकांना वाटत असल्याचा दावा बेजॉसने केला होता. बेजॉस यांच्याबद्दलच्या बातम्यांना राजकारणाचा भाग असल्याचे आरोपही काहींनी केले होते.


इन्क्वायररने म्हटले होते की बेजॉसने 455 कोटींच्या जेटमधून सांचेजला फिरवले होते. त्यावेळी 5 राज्यात 40 हजार किलोमीटरपर्यंत ट्रॅक केल्याचा दावा इन्क्वायररने केला होता. बेजॉस आणि सांचेज यांच्या डेटचे फोटोही मॅगझिनने छापले होते.


मॅगझिनने दावा केला आहे की, गेल्या काही महिन्यात बेजॉसने सांचेजला अनेक आक्षेपार्ह फोटो आणि मेसेज पाठवले आहेत. त्याचा 11 पानी अहवालात सर्व फोटो प्रसिद्ध करण्याचा दावाही इन्क्वायररने केला होता.


दरम्यान बेजॉसने पत्रकारितेच्या विशेषाधिकारांचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला आहे. मी या ब्लॅकमेलिंगला बळी न पडता त्याच्याविरोधात लढणार असल्याचे बेजॉसने म्हटले आहे.पुढे वाचा...जगातला सर्वांत श्रीमंत माणूस 25 वर्षाच्या संसारानंतर 'हिच्या'साठी होतोय विभक्त


अॅमेझॉन.कॉम या ई कॉमर्स कंपनीचे मालक आहेत जेफ बेझॉस. जगातली या घडीची सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं.


जेफ बेझॉस सध्या चर्चेत आहेत ते त्यांच्या डिव्होर्सच्या बातमीनं. आपली पत्नी मॅकेन्झी हिच्याशी 25 वर्षं संसार केल्यानंतर त्यांनी विभक्त व्हायचा निर्णय घेतला आहे.


जेफ बेझॉसच्या घटस्फोटामागे ही स्त्री असल्याचं बोललं जात आहे. लॉरेन सँचेझ ही पूर्वाश्रमीची टीव्ही अँकर जेफ यांची सध्याची गर्लफ्रेंड आहे.


जेफ बेझोस हे आजच्या घडीचे जगातले सर्वांत श्रीमंत उद्योजक आहेत. ऑनलाईन शॉपिंग पोर्टल अॅमेझॉन.कॉमचे ते मालक. लवकरच त्यांच्या या प्रचंड संपत्तीची वाटणी होणार आणि त्यांच्याजवळ राहणार फक्त अर्धा वाटा. कारण आहे घटस्फोट.


ही आहे अॅमेझॉनचे मालक जेफ बेझॉस यांची पत्नी मॅकेंन्झी बेझॉस. नवरा- बायको दोघांनीही 25 वर्षांच्या संसारानंतर आपण वेगळे होत असल्याची घोषणा ट्विटरवरून केली.


असं बोललं जातंय की, घटस्फोटानंतर मॅकेन्झीला एवढा पैसा मिळणार आहे की ती जगातली सर्वांत श्रीमंत महिला होण्याची शक्यता आहे.


अॅमेझॉनचा पसारा वाढवण्यात जेफ बेझॉसला मॅकेन्झीचीही चांगली साथ लाभली आहे. अॅमेझॉनच्या सुरुवातीच्या काळात जेफच्या बरोबरीने प्लॅनिंग आणि मार्केटिंगची कामं बायकोनं केली होती.


48 वर्षांच्या मॅकेन्झी यांचं अॅमेझॉनमध्ये मोठं योगदान असल्याचं मानलं जातं. या दोघांची पहिली भेट झाली होती न्यूयॉर्कमध्ये एका इंटरव्ह्यू दरम्यान.


जेफ बेझॉस तेव्हा डीई शॉ नावाच्या न्यूयॉर्कच्या नामांकित कंपनीत वाईस प्रेसिडंट होते. रिसर्चर म्हणून इंटरव्ह्यू द्यायला आल्या होत्या मॅकेन्झी. अखेर त्यांना ही नोकरीही मिळाली आणि त्यांची बसायची जागाही जेफ बेझॉस यांच्या केबिनला लागून होती.


मॅकेन्झी सांगतात की, त्या वेळी जेफ एवढ्या जोरात हसायचा की आवाज केबिनबाहेर येत असे. लवकरच दोघांचं लंच डेटला जाणं सुरू झालं. तीन महिन्यात एंगेजमेंटसुद्धा झाली आणि पुढच्या तीन महिन्यात त्यांचं लग्नसुद्धा झालं.


जेफ आणि मॅकेन्झी यांचं लग्न झालं 1993 मध्ये. त्या वेळी जेफ 29 वर्षांचा आणि मॅकेन्झी 23 वर्षांची होती.


लग्नानंतर एका वर्षातच जेफ बेझॉसनं आपली भल्या थोरल्या पगाराची आणि प्रतिष्ठेची नोकरी सोडली आणि आपण अॅमेझॉन.कॉम नावाची ई शॉपिंगची कंपनी सुरू करणार असल्याचं पत्नीला सांगितलं. मॅकेन्झीनं या निर्णयाला पाठिंबा दिला.


अॅमेझॉन सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जेफ आणि मॅकेन्झी कंपनीच्या प्लॅनिंगसाठी देशभर फिरत होते. सुरुवातीच्या काळात अॅमेझॉन कंपनीच्या कामात मॅकेन्झी हातभार लावत असे. हळूहळू अॅमेझॉन.कॉमचं जाळं पसरत गेलं आणि ती भलीमोठी ई कॉमर्स कंपनी बनली.


अॅमेझॉनचे जेफ आणि मॅकेन्झी बेझॉस यांच्याकडे जग एक आदर्श उद्योजक दांपत्य म्हणून पाहायला लागलं. त्याच वेळी या दोघांनी विभक्त व्हायचा निर्णय घेतला आहे.


मॅकेन्झी अमेरिकेतल्या मध्यमवर्गीय कुटुंबात मोठ्या झाल्या होत्या. त्यांचे वडील फायनान्शिअल प्लॅनर होते.


स्वतः मॅकेन्झी यांनी नंतरच्या काळात लेखिका म्हणून नाव कमवायला सुरुवात केली होती. त्यांच्या दोन कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत.


जेफ आणि मॅकेन्झी यांचा हा जुना फोटो. लग्नानंतर काही काळातच दोघांनी अॅमेझॉन कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हाचा.


जेफ आणि मॅकेन्झी यांना चार मुलं आहेत. आपण विभक्त होत असलो तरी कुटुंब म्हणून नेहमीच एकत्र असू, असं या दोघांनीही ट्विटरवर म्हटलं आहे.


ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, जेफ बेझॉस यांची संपत्ती सध्या 137 अब्ज डॉलर एवढी आहे आणि ते जगातले सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. घटस्फोटानंतर संपत्तीची वाटणी झाली, तर मॅकेन्झीला अर्धी संपत्ती मिळेल. याचा हिशोब केला तर 69 अब्ज डॉलर एवढी होईल.


सध्या जगातली सर्वांत श्रीमंत महिला आहे लॉरिएल ब्युटी प्रॉडक्ट्सची मालकीण. फ्रान्स्वा बेटेनकोर्ट मेयर्स ही लॉरिएलची मालकीणीची संपत्ती 45.6 अब्ज डॉलर आहे.


पण जेफ आणि मॅकेन्झीचा घटस्फोट झाला तर त्यांची संपत्ती विभागली जाईल. जगातला नंबर एकचा श्रीमंत माणूस बराच खालच्या नंबरवर पोहोचेल.