

आपल्या विनोदबुद्धीने लोकांना खळखळून हसवणाऱ्या आणि खलनायक होऊन त्यांना तेवढंच घाबरवणाऱ्या प्राण यांचा आज ९९ वा वाढदिवस.


प्राण यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९२० ला दिल्लीतील बल्लीमारान येथे झाला. लहानपणी त्यांचं नाव प्राण कृष्ण सिकंद असं ठेवण्यात आलं होतं. सिनेसृष्टीत आल्यानंतर त्यांनी फक्त प्राण हेच नाव ठेवलं. दिल्लीतील उच्चभ्रू कुटुंबात प्राण यांचं बालपण गेलं. अभ्यासात आणि त्यातही गणितात ते फार हुशार होते.


रामपुर येथील राजा हायस्कूलमधून त्यांना १२ वीची परीक्षा दिली. फार कमी लोकांना हे माहीत आहे की प्राण यांना फोटोग्राफर व्हायचं होतं. आलं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी दिल्लीतील ‘ए दास अँड कंपनी’त अप्रेंटिसही केली होती.


१९४० मध्ये लेखक मोहम्मद वली यांनी पानाच्या दुकानाबाहेर प्राण यांना पहिल्यांदा पाहिलं तर त्यांनी ‘यमला जट’ या पंजाबी सिनेमासाठी प्राण यांना साइन केलं. पहिलाच सिनेमा सुपर हिट ठरला होता.


लाहोर सिनेसृष्टीत खलनायक म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या प्राण यांना हिंदी सिनेसृष्टीत पहिली संधी १९६५ मध्ये ‘खानदान’ सिनेमातून मिळाली. दलसुख पांचोली यांच्या या सिनेमात त्यांच्यासोबत अभिनेत्री म्हणून नूरजहाँ होत्या.


फाळणीआधी प्राण यांनी २२ सिनेमांत नकारात्मक भूमिका केल्या. प्रसिद्ध खलनायक म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होत होती. स्वातंत्र्यानंतर त्यांनी लाहोर सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते मुंबईत स्थायिक झाले. हा त्यांच्या आयुष्यातील वाईट काळातील एक काळ होता.


मुंबईत आल्यानंतर प्राण यांनी ‘जिद्दी’ सिनेमात काम केलं. या सिनेमात मुख्य भूमिकेत देव आनंग आणि कामिनी कौशल होते. ‘जिद्दी’ सिनेमानंतर तेव्हाच्या सर्वच सिनेमांत खलनायक म्हणून प्राण यांनी काम केलं.


१९५५ मध्ये दिलीप कुमार यांच्यासोबत ‘आजाद’, ‘मधुमती’, ‘देवदास’, ‘दिल दिया दर्द लिया’, ‘राम और श्याम’ आणि ‘आदमी’ या सिनेमांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. तर देव आनंद यांच्यासोबतच्या १९५५ मध्ये आलेला ‘मुनीमजी’ आणि १९५८ मध्ये आलेल्या ‘अमरदीप’ सिनेमेही प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते.


प्राण यांनी दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांना ‘जंजीर’ सिनेमात विजयच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांचे नाव सांगितले होते. याच सिनेमानंतर अमिताभ यांच्या करिअरला कलाटणी मिळाली.


देव आनंद आणि धमेंद्र यांनी ही भूमिका नाकारली होती. प्राण यांनी मैत्रीच्या नात्याला जागत अमिताभ यांच्यासाठी ‘जंजीर’ सिनेमात शेर खान ही व्यक्तिरेखाही साकारली होती. यानंतर दोघांनी ‘डॉन’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘मजबूर’, ‘दोस्ताना’, ‘नसीब’, ‘कालिया’ आणि ‘शराबी’ अशा सिनेमांमध्ये एकत्र काम केलं.


प्राण यांना तीनवेळा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. तसेच १९९७ मध्ये फिल्मफेअर लाइफ टाइम अचीव्हमेंट पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं.


२००१ मध्ये हिंदी सिनेसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल ‘पद्मभूषण’ आणि याच वर्षात दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. प्राण यांनी आपल्या करिअरमध्ये ३५० हून अधिक सिनेमांत काम केलं. मात्र १९९७ नंतर प्राण यांना उभंही राहता येत नसल्यामुळे नंतरचं आयुष्य व्हिलचेअरवरच घालवावं लागलं.


प्राण यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर १८ एप्रिल १९४५ मध्ये त्यांना शुक्ला अहलुवालिया यांच्याशी लग्न केलं. त्यांना अरविंद, सुनील आणि पिंकी ही तीन मुलं आहेत.


१९९८ मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हा ते ७८ वर्षांचे होते. २०१३ मध्ये ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत प्राण हे दुसऱ्यांची मदत करायला नेहमीच तत्पर असायचे. अमिताभ यांच्याशिवाय त्यांनी राज कपूर यांचीही मदत केली होती.


प्रत्येक सिनेमासाठी प्राण मुख्य अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन घ्यायचे. मात्र राज कपूर यांच्या बॉबी सिनेमात त्यांनी मानधन म्हणून त्यांनी फक्त एक रुपये घेतले होते.