उत्तर भारतात दसरा शुक्रवारी साजरा झाला. जल्लोषात रावण दहन सुरू असताना अमृतसरवासियांसाठी शुक्रवारची रात्र काळरात्र ठरली. ज्या मैदानावर जल्लोष होता, फटाक्यांची आतषबाजी होती त्या मैदानाचं रूपांतर स्मशानात झालं. सर्वत्र आक्रोश पसरला, लोकांच्या किंकाळ्या, जीवाच्या आकांताने पळणारे लोक असं ह्रदय पिळवटून टाकणारं ते दृष्य होतं. अपघातातल्या मृतांचा आकडा 60 वर गेला आहे.
मैदान गर्दीनं खच्चून भरलेलं होतं. पाय ठेवायलाही जागा नव्हती. त्यामुळं लोक रेल्वे ट्रॅकवर उभे राहून कार्यक्रम पाहू लागले. रावण दहन सुरू झालं. फटाक्यांची आतषबाजीही सुरू झाली. जळत्या रावण्याच्या पुतळ्याचा काही भाग खाली कोसळला. लोकांची धावपळ सुरू झाली. त्यात फटाक्यांच्या आवाजामुळं काय होतंय हे कुणालाच कळलं नाही.
या कार्यक्रमाला एक व्यक्ती आपल्या कुटुंबियांना घेऊन जाणार होता. मात्र काही कारणांमुळे त्यांच्या घरची मंडळी येवू शकली नाही. त्यामुळं रावण दहन तुम्हाला व्हिडीओ कॉलवरून दाखवतो असं त्यांनी आपल्या घरच्या मंडळींना सांगितलं. जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा त्यांनी व्हिडीओ कॉल करून दहन आणि आतषबाजी घरच्या मंडळींना दखवली. तेही आनंदानं ती दृष्य बघत होती. मात्र पुढच्या काही सेंकदात काय बघायला मिळणार याची त्यांना कल्पानाही केली नसेल.