काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांबाबत एक थक्क करणारी गोष्ट सांगितली होती. त्यांनी म्हटलं होतं की कोरोना पेक्षा जास्त भयानक रस्ते अपघात आहेत. हे सत्य आहे. असं बघितलं तर जगभरातील वाहनांपैकी केवळ 1 टक्का भारतात आहेत. तरीसुद्धा ग्लोबल डेथ सूचीमध्ये भारताचं योगदान 11 टक्के आहे. जागतिक बँकेच्या रिपोर्टनुसार भारताचा रस्ते दुर्घटनांमध्ये पहिला क्रमांक लागतो.
देशात दरवर्षी 4.5 लाख इतके गंभीर रस्ते अपघात होतात. यामध्ये जवळपास 1.5 लाख जखमी व्यक्तींचा मृत्यू होतो. जागतिक बँकेच्या रिपोर्टनुसार देशात प्रत्येक तासाला तब्बल 53 अपघात होतं आहेत. ज्यामध्ये प्रत्येक 4 मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होतं आहे. गेल्या एक दशकात रस्ते अपघातात जवळजवळ 13 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच 50 लाखांपेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
त्याचबरोबर ड्रायव्हिंगसाठी भयानक असलेल्या देशांचा क्रम बदलत जातो. जगभरात ड्रायव्हिंग एज्युकेशन उपलब्ध करून देणारी कंपनी जुटोबीने एक अभ्यास हे जाणून घेण्यासाठीचं केला आहे. यादरम्यान 56 देशांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये असं आढळून आलं की दक्षिण आफ्रिकेतील रस्ते सर्वात जास्त भयानक आहेत. याठिकाणी रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 57 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तसंच येथे 1 लाख चालकांमध्ये मरणाऱ्यांची संख्या 36 टक्के आहे.
जगातील शक्तिशाली देश समजला जाणारा अमेरिका सुद्धा रस्ते अपघातात मागे नाही. हा देश चालकांच्या हिशोबाने जगातील तिसरा सर्वात असुरक्षित देश समजला जातो. इथे मद्यपान करून वाहन चालवण्यावर दंड तर आहे. मात्र त्याचं सक्तीनं पालन नाही केलं जातं. याठिकाणी ताशी 130 किमीच्या वेगाने वाहन चालवण्याची सुद्धा परवानगी आहे. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात अपघात होतं असतात.
त्यानंतर चौथा क्रमांक लागतो भारताचा, आपल्या देशात दरवर्षी दीड लाख लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडतात. रस्ते अपघातांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठं नुकसान होतं आहे. 2019 मध्ये जागतिक बँकेच्या 'Guide for Road Safety Opportunities' च्या अनुसार 2016 मध्ये भारतात रस्ते अपघातामुळे जीडीपीवर 12. 9 लाख कोटी रुपयांचा बोजा पडला आहे.
ड्रायव्हिंगच्या बाबतीत सर्वात सुरक्षित देशाच्या यादीत नॉर्वेचा क्रमांक पहिला लागतो. याठिकाणी दरवर्षी प्रती लाख चालकांच्या मागे 2.7 टक्के लोकांचा मृत्यू होतो. याठिकाणी वाहनांसंबंधी खूपचं कठोर कायदे करण्यात आले आहेत. याठिकाणी लोकही अतिशय जागरूक आहेत. 95 टक्के लोक सीटबेल्ट वापरूनचं वाहन चालवतात. नॉर्वेनंतर जपानचा क्रमांक लागतो. येथील लोकही खूप शिस्तबद्ध आहेत.