

सध्या संपूर्ण देशभरात निवडणुकीचं वातावरण आहे. यंदा अनेक बॉलिवूड कलाकारांनी राजकीय रिंगणात उडी घेतल्यानं यंदाची निवडणूक विशेष चर्चेत आहेत. या कलाकारांपैकी एक म्हणजे रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर. उर्मिला यांनी 27 मार्चला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण त्यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात अनेक प्रश्न उठले.


उर्मिला यांना उत्तर मुंबईमधून काँग्रेसकडून उमेदावारी मिळाल्यानंतर सोशल मीडियावरुन टीका केली गेली. उर्मिला यांनी स्वतःहून 9 वर्षांनी लहान असलेल्या मोहसिन अख्तर मीरया मुस्लीम मुलाशी लग्न केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील लोकांचं असं म्हणणं आहे की, लग्नाच्या वेळी उर्मिला यांनी इस्लाम धर्म स्विकारला आहे. तसंच लग्नानंतर त्यांनी आपलं नाव बदलून मरियम असं केलं आहे आणि यावरूनच उर्मिला यांना सोशल मीडियावर ट्रोल केल जात आहे.


मात्र उर्मिलांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरीही त्यांचे वडील श्रीकांत मातोंडकर यांनी या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. 'अशा प्रकारचे घाणेरडे आरोप करणाऱ्या काही लोकांमुळे उर्मिला यांनी काळजी करण्याची किंवा अशा लोकांच्या प्रतिक्रिया गांभीर्यानं घेण्याची गरज नाही.' असं उर्मिलांच्या वडीलांनी म्हटलं आहे.


उर्मिला यांनी आपल्या सिने करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. मराठी सिनेमा झाकोळ(1980) मधून त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर कलियुग (1981) हा त्यांचा पहिला हिंदी सिनेमा होता. मात्र त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली ती मासूम या सिनेमानं. बऱ्याच काळ बॉलिवूडपासून दूर असलेल्या उर्मिलांनी 2018 मध्ये इरफान खानच्या ब्लॅकमेलमधून आयटम साँगद्वारे कमबॅक करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला.


उर्मिला आणि मोहसिन यांची लव्ह स्टोरी सुद्धा कोणत्या सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाही. त्या दोघांची ओळख डिझायनर मनिष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात झाली होती. त्यानंतर त्यांच्यातील जवळीक वाढली आणि अखेर त्यांनी 2015 मध्ये लग्न केलं. मोहसिन 2007च्या मिस्टर इंडिया स्पर्धेचा सेकंड रनरअप आहे. याशिवाय त्यानं 'लक बाय चान्स' या सिनेमातही काम केलं आहे.