Bal Puraskar 2021: धाडसी, निर्भिड, कलाकार आणि एकसे एक कल्पक 32 छोट्यांना मोठा सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. कुणी पिसाळलेल्या बैलाला सामोरं जात दुसऱ्याचे प्राण वाचवले, तर कुणी धनुष्य बाणाचा अचूक नेम साधल.. एक से एक कल्पक, हुशार कलाकार मुलांची कामगिरी (Bal Puraskar 2021 List) इथे वाचा


1/33 पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांनी नुकताच पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी (Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ही लहान मुले म्हणजे इतरांसाठी मोठा प्रेरणास्रोत असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी या वेळी काढले. देशभरातील 21 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील या 32 मुलांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. क्रीडा, संस्कृती, कला, समाजसेवा या विविध विभागात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मुलांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. (Image: Govt. of India)


2/ 33 उत्तर प्रदेशमधील लखनौचा रहिवासी असलेल्या कुंवर दिव्यांश याने आपल्या बहिणीबरोबरच सात मुलांची बैलाच्या हल्ल्यातून सुटका केली होती. वैज्ञानिक संशोधन केल्याप्रकरणीदेखील त्याला पुरस्कार मिळाला असून विविध कामगिरींसाठी त्याने अनेक पुरस्कार मिळवले आहेत. त्याला शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे. (Image: Govt. of India)


3/ 33 कोरोनाच्या कालखंडात 15 वर्षीय ज्योती कुमारी हिने आपले जखमी वडील मोहन पासवान यांना सायकलवर डबलसीट घेऊन सलग 7 दिवस गुरुग्राम ते बिहार असा तब्बल 1200 किलोमीटरचा प्रवास केला. तिच्या या धाडसासाठी तिला हा शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. (Image: Govt. of India)


4/ 33 महाराष्ट्रातील कमलेश वाघमारे या मुलानं बुडत असलेल्या दोन मुलांचे प्राण वाचवले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे. भविष्यात त्याला राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू व्हायचे आहे. (Image: Govt. of India)


5/ 33 उत्तर प्रदेशमधील लखनौचा रहिवासी असलेला व्योम अहुजा हा बासरी, ड्रम, माऊथ ऑर्गन यांसारखी तब्बल नऊ वाद्य वाजवण्यात पारंगत आहे. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी त्यानं हे प्राविण्य मिळवलं आहे. त्याबद्दल त्याला संगीत क्षेत्रासाठी बाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. (Image: Govt. of India)


6/ 33 कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी मणिपूरच्या केंद्रीय विद्यालयातील अकराव्या वर्गात शिकणाऱ्या वेणीश कैशमला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. कला क्षेत्रातील भरीव कामगिरीबरोबरच तिला या क्षेत्रात प्राध्यापक देखील व्हायचं आहे.(Image: Govt. of India)


7/ 33 केरळच्या कोचीमधील पाचवीत शिकणाऱ्या वीर कश्यपने कोरोना युगा नावाचा बोर्ड गेम तयार केला आहे. या कामगिरीसाठी त्याला क्रीडा बाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याला क्रिकेट खेळणे, रुबिक क्यूब सोडवणे आणि गिटार वाजवायलादेखील आवडते. (Image: Govt. of India)


8/ 33 आसाममधील एस. ई. आर. एस पब्लिक स्कुलमधील तनुज समद्दार याला फाईन आर्ट्समधील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. फाईन आर्ट्समध्ये त्याला विशेष आवड असून, वयाच्या अवघ्या दीड वर्षांपासून तो कला क्षेत्रात रमला आहे. भविष्यात त्याला डिझायनर व्हायचं आहे. (Image: Govt. of India)


9/ 33 पश्चिम बंगालमधील सौंदर्य डे या मुलाने अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक कथा लिहिल्या आहेत. त्याच्या या भरीव कामगिरीसाठी त्याला साहित्यातील बाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.(Image: Govt. of India)


10/ 33 पुण्याच्या सोनित सिसोलेकर याला विज्ञानातील कामगिरीसाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याने वयाच्या 11 व्या वर्षी सर्वोत्तम वैज्ञानिक म्हणून पुरस्कार जिंकला आहे.(Image: Govt. of India)


11/ 33 महाराष्ट्रातील नागपूरमधील श्रीनाभ अगरवाल याला शेती आणि विज्ञानातील उल्लेखनीय संशोधनासाठी पुरस्कार देण्यात येत आहे. सोप्या पद्धतीने शेती करता यावी यासाठी तो संशोधन करत आहे. (Image: Govt. of India)


12/ 33 झारखंडच्या रांचीमधील सविता कुमारीला क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. 2014 पासून ती तिरंदाजीमध्ये आपले प्राविण्य दाखवत असून विविध पुरस्कार देखील मिळवले आहेत. (Image: Govt. of India)


13/ 33 कर्नाटकमधील राकेश कृष्णा या मुलाने शेतकऱ्यांसाठी सिडोग्राफर नावाचे यंत्र तयार केलं आहे. बियाणे पेरण्यासाठी याची मदत होणार असून यामुळे शेतकऱ्यांचे काम सोपे होणार आहे. त्याच्या या संशोधनासाठी त्याला विज्ञान आणि संशोधन क्षेत्रासाठी बाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.(Image: Govt. of India)


14/ 33 तामिळनाडूमधील प्रसिद्धी सिंग ही मुलगी समाजकारणासाठी ओळखली जाते. प्रसिद्धी फॉरेस्ट या आपल्या संस्थेमार्फत पुढील 2 वर्षात 1 लाख फळझाडांची लागवड करण्याचे तिचे ध्येय आहे. तिच्या या सामाजिक कार्यासाठी तिला बाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. (Image: Govt. of India)


15/ 33 मध्यप्रदेशातील इंदोरच्या पलक शर्मा हिने लहान मुलांच्या वयोगटातील आशियाई जलतरणपटू म्हणून सुवर्णपदक मिळवले आहे. इतक्या लहान वयात ही कामगिरी केल्याने तिला क्रीडा क्षेत्रासाठी बाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. (Image: Govt. of India)


16/ 33 पंजाबच्या लुधियानामधील नम्या जोशी या मुलीने गेमच्या माध्यमातून एक अभ्यासक्रम तयार केला आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला(Satya Nadela) यांनीदेखील यासाठी तिचा सन्मान केला आहे. संशोधनाच्या कामगिरीसाठी तिला विविध पुरस्कार मिळाले आहेत. (Image: Govt. of India)


17/ 33 उत्तर प्रदेशच्या अलिगडमधील मोहम्मद शादाब याने अमेरिकेतील प्रसिद्ध youth exchange and study ही स्कॉलरशिप मिळवली आहे. तो भारताचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून प्रतिनिधित्व करत आहे. त्याच्या या बुद्धिमतेसाठी त्याला बाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. (Image: Govt. of India)


18/ 33 अलाहाबादच्या 16 वर्षीय मोहम्मद याने 2019 मध्ये मंगोलियात झालेल्या पहिल्या आशियाई आर्टिस्टिक जिमनॅस्टिक स्पर्धेत भारतासाठी कांस्य पदक जिंकले होते. क्रीडा क्षेत्रातील या भरीव कामगिरीसाठी त्याला सन्मानित करण्यात येणार आहे. (Image: Govt. of India)


19/ 33 गुजरातमधील मंत्रा जितेंद्र डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलाने मालदीवमध्ये झालेल्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत दोन सुवर्णपदकं पटकावली होती. त्याने दाखवलेल्या जिद्दीसाठी त्याला बाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. (Image: Govt. of India)


20/ 33 गुजरातमधील ख़ुशी पटेल या मुलीने अगदी लहान वयात स्केटिंगमध्ये प्राविण्य मिळवले आहे. जागतिक स्तरावरील आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये तिने या क्रीडा प्रकारात विजेतेपद मिळवले आहे. (Image: Govt. of India)


21/ 33 महाराष्ट्रातील काम्या कार्तिकेयन ही 13 वर्षीय मुलगी सर्वात कमी वयाची गिर्यारोहक ठरली आहे. तिने विविध शिखरे आणि पर्वत सर केले असून, साहस नावाचे मिशन तिनं सुरू केलं आहे. या प्रकारातील ग्रँडस्लॅम पूर्ण करण्यासाठी ती प्रयत्न करत आहे. तिच्या या कामगिरीसाठी क्रीडा क्षेत्रातील बाल पुरस्कार देऊन तिला सन्मानित करण्यात येत आहे. (Image: Govt. of India)


22/ 33 केरळच्या ह्रदया आर क्रिष्णन या मुलीनं अगदी लहान वयात वीणा वादनात प्राविण्य मिळवले आहे. केरळ सरकारकडून दिला जाणारा शास्र प्रतिभा हा पुरस्कार तिने सलग 3 वर्ष पटकावला आहे. तिच्या या कामगिरीसाठी तिला संगीत क्षेत्रासाठी बाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. (Image: Govt. of India)


23/ 33 हैदराबादमधील हिमेश चडालवाडा या 14 वर्षांच्या विद्यार्थ्यानं वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन केलं आहे. नुकतेच त्याने अल्झायमरच्या रुग्णांसाठी मनगटी घड्याळाचे संशोधन केलं आहे. त्याला संशोधन क्षेत्रातील बाल पुरस्कार देण्यात येत आहे. (Image: Govt. of India)


24/ 33 जम्मूमधील हर्मनज्योत सिंग या विद्यार्थ्याने विविध ऑलिम्पियाडमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. त्याचबरोबर विविध प्रकारची मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्यातदेखील तो तरबेज आहे. त्याच्या खास महिलांसाठी असलेल्या रक्षा(Raksha) या अॅपला सिलिकॉन व्हॅलीमध्ये निवडण्यात आले होते. याचबरोबर गुगल प्ले स्टोअरवरदेखील ते अपलोड करण्यात आलं आहे. त्याला कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग क्षेत्रातील बाल पुरस्कार देण्यात येणार आहे. (Image: Govt. of India)


25/ 33 उत्तर प्रदेशच्या नोयडामधील रहिवासी असलेल्या चिराग भंसाळी या विद्यार्थाने विविध प्रकारच्या मोबाईल अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. गणित ऑलिम्पियाडमध्ये त्याने सलग 3 वर्ष गोल्ड मेडल जिंकले आहे. त्याच्या नाविन्यपूर्ण मोबाईल अॅप्लिकेशनच्या निर्मितीसाठी त्याला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. (Image: Govt. of India)


26/ 33 सिक्कीमधील आयुष रंजन या मुलाने विविध प्रकारच्या मोबाईल अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. त्याचे 10 पेक्षा जास्त अॅप हे गुगल प्ले स्टोअरवर आहेत. त्याच्या नाविन्यपूर्ण मोबाइल अॅप्लिकेशनच्या निर्मितीसाठी त्याला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. (Image: Govt. of India)


27/ 33 वयाच्या पाचव्या वर्षी इंटरनॅशनल चेस स्पर्धेत सहभागी होणारी आर्शिया दास ही एकमेव मुलगी आहे. उजबेकिस्तानमध्ये झालेल्या शालेय आशियाई चेस स्पर्धेत नॉर्थ इस्ट राज्यांतील सहभागी एकमेव स्पर्धक होती. (Image: Govt. of India)


28/ 33 महाराष्ट्रातील जळगावमधील अर्चित पाटील या मुलाने महिलांसाठी विशेष डिव्हाईस तयार केलं आहे. यामुळे बाळंतपणादरम्यान होणाऱ्या महिलांच्या मृत्यूमध्ये घट होणार असून हे डिव्हाईस खूपच फायदेशीर आहे. त्याच्या निर्मितीसाठी त्याला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. (Image: Govt. of India)


29/ 33 ओरिसाच्या भुवनेश्वरमधील या मुलाची बुद्धिमता अफाट आहे. विविध ऑलिम्पियाड स्पर्धेत त्याने पुरस्कार मिळवले असून, शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी त्याला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. (Image: Govt. of India)


30/ 33 उत्तराखंडच्या अनुराग रमोला याने कला क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवले आहे. त्याने आतापर्यंत 235 पुरस्कार मिळवले असून, त्याच्या कला क्षेत्रातील कामगिरीसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात येत आहे. (Image: Govt. of India)


31/ 33 मध्य प्रदेशमधील अनुज जैन याने जागतिक पातळीवर अनेक विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. (Image: Govt. of India)


32/ 33 राजस्थानच्या आनंद कुमार याने गणितामध्ये अनेक नवीन प्रमेयांचा(Theorem) शोध लावला आहे. त्याने गणितामध्ये विविध पुरस्कार मिळवले असून, त्याला गणितातील विशेष कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. (Image: Govt. of India)


33/ 33 वयाच्या चौथ्या वर्षापासून भरतनाट्यम आणि कुचीपुडी नृत्याचं शिक्षण घेणाऱ्या आंध्र प्रदेशमधील 12 वर्षांच्या अमेया लागुडू हिने अनेक देशांमध्ये 100 हुन अधिक शो केले असून तिच्या या कामगिरीसाठी कला आणि संस्कृती क्षेत्रासाठीचा बाल पुरस्कार देऊन तिला सन्मानित करण्यात येत आहे. (Image: Govt. of India)