वेबसीरिज चटनी आणि काही वर्षांपूर्वीचा अजय देवगण अभिनित दृश्यम या चित्रपटाशी या हत्येचं बऱ्यापैकी साधर्म्य असल्याचं पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून उघड होतंय. दोन वर्षांपूर्वी दिल्लीच्या डाबडी भागात ही घटना घडली. चंद्र प्रकाश नावाचा आपला भाचा गायब झाल्याची तक्रार त्याच्या मामानेच २ वर्षांपूर्वी पोलिसात दाखल केली होती. आता उघड होतंय की, हा मामाच चंद्र प्रकाशचा मारेकरी होता.
हे मामा चंद्र प्रकाशच्या बरोबरच तिसऱ्या मजल्यावरच्या घरात भाड्यानं राहायचे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी प्रकाश बेपत्ता असल्याची तक्रार डाबडी पोलीस ठाण्यात केली आणि त्यानंतर काही दिवसातच मामाही ते घर सोडून दुसरीकडे राहायला गेला. या घरात राहायला आलेल्या नव्या भाडेकरूनं काही कारणासाठी घराचं नूतनीकरण सुरू केलं, त्या वेळी बाल्कनीचं काम करताना त्याला फरशीखाली एक सापळा सापडला आणि मग खळबळ उडाली. हा सापळा २ वर्षांपूर्वी गायब झालेल्या चंद्र प्रकाशचाच असू शकतो.
पोलिसांनी आपल्या तपासाला पुष्टी देण्यासाठी हा सापळ्यात रुपांतरीत झालेला मृतदेह डीएनए चाचणीसाठी पाठवला आहे. २०१६मध्ये चंद्र प्रकाशच्या बेपत्ता झाल्यानंतर तपास करणाऱ्या पोलीस कर्माचाऱ्यांकडे आता पुन्हा नव्याने चौकशी करण्यात येत आहे. आरोपी मामा फरार आहे. हे दोन्ही मामा - भाचे मूळचे आंध्र प्रदेशचे असल्याचं समजतंय.