

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा आणि दक्षिण भारतातले प्रसिद्ध नेते करूणानिधी यांचं प्रदीर्घकाळाने निधन झालं. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


त्यांच्या निधनानंतर तामिळनाडू शोकसागरात बुडाला. राज्यात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. मरीना बीच येथे त्यांचे गुरू अन्नादुरई यांच्या बाजूला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


दक्षिण भारतात सिनेमाकडून राजकारणात प्रवेश करण्याचा ट्रेण्ड फार जूना आहे. पाचवेळा मुख्यमंत्री आणि १२ वेळा विधानसभा सदस्य झालेले करुणानिधीही कलाक्षेत्रातून राजकारणात आले होते.


करुणानिधी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी संपूर्ण तमिळनाडू त्यांच्या पार्थिवाकडे जमा झाले होते. यावरूनच त्यांची लोकप्रियता लक्षात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले.


भारत खासकरून तमिळनाडूकरांच्या ते नेहमीच लक्षात राहतील. करुणानिधी यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशा शब्दात मोदी यांनी ट्विट केले.


एमके स्टालिन यांनी एका कवितेच्या माध्यमातून आपल्य वडिलांना श्रद्धांजली दिली. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, मी आयुष्यभर तुम्हाला लिडर म्हणत आलोय पण आज शेवटचं मी तुम्हाला अप्पा म्हणून हाक मारू का? स्टालिन आपल्या वडिलांना थलाइवा म्हणून हाक मारायचे.


काही दिवसांपासून ९४ वर्षीय करुणानिधी यांची प्रकृती खालावत चालली होती. रक्तदाब आणि यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनच्या तक्रारीमुळे त्यांना २७-२८ जुलैच्या रात्री कावेरी रुग्णालयात भर्ती करण्यात आले. मंगळवारी ६ वाजून १० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


करुणानिधींच्या शवपेटीवर ‘आयुष्यभर ज्याने कधी आराम केला नाही तो आज आराम करत आहे,’ असा संदेश लिहिला आहे.