

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी वयाच्या 63 व्या वर्षी निधन झाले. देशातील तरुणांमध्ये लोकप्रिय आणि आदर्श मानल्या जाणाऱ्या मोजक्या राजकीय नेत्यांमधील पर्रिकर हे एक नेता होते.


पर्रिकर गेल्या वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. ते शेवट पर्यंत गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत राहिले.


10 फेब्रुवारीला पर्रिकर भाजपाध्यक्ष अमित शाहा यांच्यासोबत भाजपच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे जास्त बोलता येणार नाही असे सांगत भाषण आटोपतं घेतलं होतं.


त्या अगोदर 30 जानेवारीला मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोव्याचा अर्थसंकल्प सादर केला होता. तेव्हा त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले होतं. मुझमें काफी जोश है और मैं पूर तरह होश में हूं, असं पर्रीकरांनी म्हटलं होतं.


फेब्रुवारी 2018 मध्ये मनोहर पर्रीकरांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर पर्रिकर तीन महिने उपचारासाठी न्यूयॉर्कला गेले होते.


कर्करोगासारख्या गंभीर आजारानंतरही पर्रीकरांनी काम करणे थांबवले नाही. जूनला भारतात आल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली.


अर्थसंकल्प सादर करताना पर्रिकर यांनी आपण स्वत:ला गोव्याच्या भूमीसाठी संपूर्ण वाहून घेतल्याचे म्हटले होते. तसेच प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठ राहून अखेरच्या श्वासापर्यंत गोव्याची सेवा करेन असा शब्दही त्यांनी दिला होता.


गेल्या महिन्याभरात पर्रीकरांची प्रकृती हळूहळू खालावत गेली. या काळातही त्यांनी राज्यातील काही कार्यक्रमात हजेरी लावली होती.