

आज सकाळी 8 च्या सुमारास 60 वर्षीय अनिल कुमार यांच्या घराला भीषण आग लागली. यामध्ये अनिल कुमार (वय- 60) आणि त्यांची पत्नी सुनिता (वय-55) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या घरात ठेवलेला कचरा, वर्तमानपत्रे, पुठ्ठे आणि रद्दीला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला.


अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे दीड तास अथक प्रयत्न करत बचाव मोहीम राबवली. पण आग इतकी भीषण होती की जवान घरात बंद असलेल्या वृद्ध दांपत्याचे जीव वाचवू शकले नाहीत. घरात लागलेल्या भीषण आगीत अनिल कुमार (60) आणि त्यांची पत्नी सुनीता (वय 55) यांचा जिवंत जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले. मृतदेह खूपच खराब स्थितीत होते, त्यामुळं त्यांना कपड्यांच्या चादरीत गुंडाळून बाहेर आणण्यात आलं. ही घटना राज्यस्थानातील श्रीगंगानगर येथे घडली.


शेजारच्या लोकांच्या मते, हे वृद्ध दांपत्य मानसिक आजारानं ग्रस्त होतं. त्यांना घरात कचरा गोळा करण्याची सवय असल्यामुळे आणि शक्यतो शेकोटी पेटवल्यामुळं मोठी आग लागल्याचा अंदाज आहे. शेजार्यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेची पोलिसांना अनेकदा माहिती देऊनही त्यांनी वेळीच पाऊलं उचलली नाहीत, त्यामुळं अखेर हा दुर्दैवी अपघात झाला.


असं सांगितलं जात आहे की, मृत जोडप्याचे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसोबत त्यांच्या संपत्तीवरून कौटुंबिक वाद होता. त्यांचे जवळचे नातेवाईक त्यांची संपत्ती हडपतील याची भिती या वृद्ध दांपत्याला होती. त्यामुळे जवळच्या नातेवाईकांनीही घरात कचरा गोळा करून उपद्रव मांडल्याबद्दल पोलिसांकडे तक्रार दिली होती.