PHOTO: वयाच्या 65व्या वर्षी माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे दुसऱ्यांदा बोहल्यावर
Harish Salve Marriage Photos: भारताचे माजी सॉलिसिटर जनरल (Solicitor General) आणि सुप्रीम कोर्टातील दिग्गज वकील हरीश साळवे (Harish Salve) यांनी दुसरा विवाह केला आहे. 65 वर्षीय हरीश यांनी आपली ब्रिटिश मैत्रीण कॅरोलीन ब्रॉसार्ड (Caroline Brossard) हिच्याशी लंडनमध्ये विवाह केला.


केवळ 15 लोकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा खूपच खासगी होता. या लग्नाला त्यांचे कुटुंबीय आणि काही मित्र उपस्थित होते. याच वर्षी साळवे यांनी आपली पहिली पत्नी मीनाक्षी यांना घटस्फोट दिला होता. हरीश यांना साक्षी आणि सानिया नावाच्या दोन मुली आहेत.


हरीश यांच्याप्रमाणेच कॅरोलीन ब्रॉसार्ड यांचंदेखील पहिलं लग्न झालं आहे. 56 वर्षीय कॅरोलीन ब्रिटिश कलाकार असून त्यांना एक मुलगी देखील आहे.


रिपोर्टनुसार, कॅरोलीन ब्रॉसार्ड यांची हरीश यांच्याबरोबर एका कला प्रदर्शनात भेट झाली होती. त्यानंतर हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.


हरीश साळवे हे भारतातील सर्वांत महागड्या वकीलांपैकी एक आहेत. आंतरराष्ट्रीय कोर्टात साळवे यांनी भारताच्या वतीने कुलभूषण जाधव यांची बाजू मांडली होती. एका दिवसाच्या सुनावणीसाठी साळवे जवळपास पाच लाख रुपये फी घेतात.


हरीश साळवे यांचा जन्म 22 जून 1955 ला महाराष्ट्रातील नागपूरमध्ये झाला. त्यांचे आजोबा पी. के. साळवे हे देखील विख्यात क्रिमिनल लॉयर होते. त्यांचे वडील एन. के. पी. साळवे भारतीय क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष होते. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला हरीश यांनी टॅक्स लॉयर असलेल्या आपल्या आजीच्या हाताखाली काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1976 साली त्यांनी दिग्गज वकील सोली सोराबजी यांच्या हाताखाली प्रॅक्टिसला सुरुवात केली. त्यानंतर दिल्लीला जाऊन सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस सुरु केली. 1992 साली सुप्रीम कोर्टातून त्यांना जेष्ठ वकील ही पदवी मिळाली. सरकारने त्यांची 1999 मध्ये सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती केली होती. तो कार्यकाळ पूर्ण झाल्यावर 2002 मध्ये त्यांना सलग दुसऱ्यांना ही ऑफर मिळाली होती पण त्यांनी ती स्वीकारली नाही. (फोटो सौजन्य : ट्विटर)