मोदींचे मंत्री शाही जेवणाला हातात प्लेट घेऊन जेवत होते, या नव्या मंत्र्यांनी पसंत केलं जमिनीवर बसून जेवणं
सर्वांत गरीब खासदार ही आपली ओळख बरी वाटते, असंही हे मंत्रिमहोदय म्हणतात. त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलेला शपथविधी सोहळ्यानंतरच्या शाही भोजनाच्या कार्यक्रमाचा किस्सा...


मोदींच्या मंत्रिमंडळातले हे एक सर्वांत चर्चेतलं नाव. ते त्यांच्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहेत. देशातले सगळ्यांत गरीब खासदार अशीही ओळख त्यांना मिळाली आहे. त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलेला एक किस्सा..


शपथविधी सोहळ्यानंतरच्या शाही जेवणाच्या कार्यक्रमात मोदींचे नवे मंत्रिगण हातात जेवणाची प्लेट घेऊन उभ्याने जेवत होते. शाही गाला डिनरमध्ये ही नेहमीची गोष्ट. पण या मंत्रिमहोदयांनी एका दूरच्या कोपऱ्यात बसून जेवण करणं पसंत केलं.


राष्ट्रपती भवनाच्या आलिशान दालनात आपण चक्क जमिनीवर बसून जेवलो, असा किस्सा त्यांनीच स्वतः नवभारत टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला. ओडिशाचे मोदी अशी ओळख असलेल्या या नवनिर्वाचित खासदार आणि नव्या मंत्र्यांचा आणखी एक किस्सा वाचावा असा...


लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्यानंतर नवनिर्वाचित खासदारांची एक बैठक नरेंद्र मोदींनी दिल्लीत बोलावली होती. कोणाला मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता तेव्हा साऱ्या देशालाच होती.


मंत्रिपदाच्या शर्यतीत NDA च्या 353 खासदारांपैकी कुणाची वर्णी लागणार याची माहिती अखेरपर्यंत उघड झालेली नव्हती. शपथविधी जाहीर झाल्यानंतरही कुणाला मंत्रिपद मिळणार हे उघड झालेलं नव्हतं.


प्रत्यक्ष शपथविधीपूर्वी ठरावीक काळ आधी मंत्रिपद दिलं जाईल त्यांना कळवलं जाईल, असं स्वतः मोदींनीच खासदारांना सांगितलं होतं. त्यामुळे खासदारांमध्ये चलबिचल असणं स्वाभाविक होतं. पण याला अपवाद होते हे एक खासदार..


मंत्रिपद देणार असल्याची माहिती पक्षाच्या हाय कमांडकडून किंवा मोठ्या पदाधिकाऱ्यांकडून थेट खासदाराच्या फोनवर देण्याचीच पद्धत आहे. तोच सर्वांत सोपा मार्ग म्हणून अवलंबला जातो.


त्यामुळे खासदार म्हणून विजयी झाल्यानंतर अनेक खासदारांच्या मनात आपल्याला आता पक्षाध्यक्षांच्या वतीने फोन कॉल यावा असं वाटत असणार यात शंका नाही. पण...


याला अपवाद ठरले हे एक खासदार. जे मंत्री कसे झाले आणि त्यांना शपथविधीपूर्वी दिल्लीला बोलावून घेताना कशी तारांबळ उडाली याची कहाणी आता उघड होते आहे.


एकीकडे अनेक खासदार पक्षाध्यक्षांकडून येणाऱ्या त्या फोनची आतुरतेने वाट पाहात असतात, तर दुसरीकडे हे खासदार महाशय मात्र आपल्या दैनंदिन कामात व्यग्र होते आणि तेही आपला मोबाईल सायलेंट मोडवर टाकून...


या खासदार महाशयांना पार्टी हायकमांडकडून अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांचा फोन काही खासदारांनी उडलला नाही.


तुमची मंत्रिपदी निवड झाली आहे, हे सांगण्यासाठी त्यांना दिल्लीतून फोन येत होता तेव्हा हे महाशय फोन आपल्या झोळीत टाकून भाजप कार्यालयाच्या आसपास फिरत होते.


आता शपथविधीपूर्वी यांना दिल्लीत वेळेवर कसं बोलावून घ्यायचं याचा विचार करत असतानाच शेवटी एकदाचा या खासदारांचा फोन लागला.


फोन का नाही उचलला, असं वैतागाने दिल्लीतून विचारण्यात आल्यावर यांनी शांतपणे उत्तर दिलं की, 'निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अनेक जण अभिनंदनाचा फोन करत होते. त्यामुळे सारखा फोन वाजत होता. शेवटी सायलेंटवर टाकला.'


भाजप अध्यक्ष फोनवर आले आणि त्यांनी तातडीने दिल्लीला शपथविधी सोहळ्यासाठी यावं असं सांगितलं. तेव्हाही या नवनिर्वाचित खासदार महाशयांना नेमका अर्थ उमगला नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्याबरोबर शपथविधी सोहळ्याला हजर व्हा, असं अध्यक्षांनी सांगिलं तेव्हा...


शपथ घ्यायला मी कशाला बरोबर येऊ? असंही त्यांनी विचारलं म्हणे. तुम्हीच मंत्री होणार आहात. तुम्हालाही शपथ घ्यायची आहे, असं सांगितलं तेव्हा त्यांना उलगडा झाला.


ओडिशाचे खासदार प्रतापचंद्र सारंगी यांचा समावेश नरेंद्र मोदींच्या नव्या कॅबिनेटमध्ये झाला. त्यांची ही गोष्ट. सारंगी यांच्याकडे लघु-मध्यम उद्योग खातं आणि पशु-मत्स्यपालन दुग्ध व्यवसाय खात्याचं राज्यमंत्रिपद आहे.


हे गवताने शाकारलेलं मातीचं घर देशाच्या केंद्रीय मंत्र्याचं आहे, हे सांगूनही खरं वाटणार नाही. सर्वांत गरीब खासदार, ओडिशाचे मोदी अशी ओळख असणाऱ्या प्रतापचंद्र सारंगी यांचं हे घर.


सारंगी हे ओडिशाच्या किनारी भागातले लोकप्रिय आणि आत्मीयतेनं काम करणारे भाजप कार्यकर्ते आहेत. ते दोन वेळा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत आणि आता खासदार म्हणून दिल्लीत गेले आहेत.


अत्यंत साधी राहणी, सायकलवरून फिरणं ही त्यांची ओळख. बालासोर जिल्ह्यातल्या निलगिरीजवळचं गोपिनाथपूर हे त्यांचं गाव. तिथे साध्या कुडाच्या भिंती असलेल्या साध्याशा घरात ते राहतात.


सारंगी अविवाहित आहेत. धाकटी बहीण बिलासिनी पांडा आणि तिचा पती मनोरंजन पांडा सारंगी यांच्यासमवेत या घरात राहतात.


"दोनदा आमदार होऊनसुद्धा नानांनी म्हणजे आपल्या मोठ्या भावाने राहणीमानात आणि घरात काही बदल केले नाहीत. आता केंद्रात मंत्रिपद मिळाल्यावरसुद्धा घर बदलेल असं वाटत नाही", असं त्यांची त्यांची धाकटी बहीण बिलासिनी पांडा सांगतात.


प्रताप चंद्र सारंगी यांनी केंद्रीय मंत्री म्हणू शपथ घेतल्यानंतर हे ओडिशाचे मोदी सोशल मीडियावर ट्रेंडिंग झाले. या सर्वांत गरीब खासदाराचं घर बघायला निलगिरीजवळच्या त्यांच्या छोट्याशा घराबाहेर तीर्थक्षेत्राला असतात तशा लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.


ओडिशातील बालशोर लोकसभा मतदारसंघातून प्रतापचंद्र सारंगी भाजपच्या तिकीटावर विजयी झाले. त्यांनी बीजेडीच्या रविंद्र कुमार जेना यांना 12,956 मतांनी हरवलं. 2014मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण, 2019मध्ये मात्र त्यांनी विजय मिळवला.


सोशल मीडियावर प्रचापचंद्र सारंगी यांच्याबद्दल जोरदार चर्चा आहे. त्यांना ओडिशाचे मोदी म्हणून देखील ओळखले जाते. त्यांनी लग्न देखील केलेलं नाही. आज देखील ते झोपडीत राहतात. त्यांची आर्थिक स्थिती अजिबात चांगली नाही.


प्रतापचंद्र सारंगी यांचा जन्म बालसोर येथील गोपीनथपूर येथील गरीब कुटुंबात झाला. लहानपणापासून अध्यात्मिक असलेले सारंगी यांनी पदवीपर्यंतच शिक्षण घेतलं आहे.


प्रतापचंद्र सारंगी यांनी साधू बनायचं होतं. त्यासाठी ते रामकृष्ण मठात गेले. पण, मठातील लोकांनी वडील नाहीत तर आधी आईची सेवा करण्याचा सल्ला त्यांना दिला.


सारंगी हे सायकलवरून प्रवास करतात. त्यांनी बालासोर आणि मयूरभंज जिल्ह्यातील आदिवासी भागात शाळा बांधल्या आहेत. वैयक्तिक गरजा कमीत कमी ठेवल्या आहेत.