

2020 या वर्षातील आणखी एक दु:खदायक घटना आज घडली आहे. MDH चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं आहे. पहाटे 5.38 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे.


काही दिवसांपूर्वी गुलाटी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनातून बरे झाल्यानंतर महाशय धर्मपाल यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली आणि गुरुवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


आज 'फेटेवाले आजोबा' म्हणून घराघरात धर्मपाल गुलाटी पोहोचले आहेत. वर्षानुवर्षे MDH ची अनेक उत्पादनं घराघरात पाहायला मिळतात. पाकिस्तानातून भारतात आलेले कुटुंब, वडिलांचा मसाल्याचा व्यवसाय एवढच नव्हे तर कुटुंबासाठी टांगाचालकाचं केलेलं काम.. असे अनेक चढउतार महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या आयुष्यात आले आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबाबत माहित नसलेल्या या गोष्टी


धर्मपाल यांच्या वडिलांनी सियालकोट (आता पाकिस्तानात) मध्ये 1919मध्ये मसाल्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला होता. फाळणीनंतर गुलाटी कुटुंबीय दिल्लीत स्थायिक झाले. तेव्हा सुरुवातीला त्यांनी उपजिविकेसाठी टांगाही चालवला होता. त्यानंतर करोलबाग इथं एका लाकडाच्या लहानश्या पेटील मसाले विकायला सुरूवात केली. तेव्हापासून तो व्यवसाय वाढतच गेला.


धर्मपाल हे एमडीएच मसाल्याचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर देखील होते. गेली अनेक वर्ष ते कंपनीच्या मसाल्यांचे ब्रॅण्डींग करत होते. त्यांच्या जाहिरातींना उत्तम प्रतिसादही मिळतो. एमडीएच मसाल्याच्या प्रत्येक पाकिटावर तुम्ही या आजोबांचा फोटो पाहिलाच असेल.


फक्त पाचवी पर्यंत शिक्षण झालेल्या या आजोबांनी बड्या बड्या उद्योगपतींना मागे टाकत 2017 मध्ये देशातील सर्वात श्रीमंत सीईओ होण्याचा मान पटकावला होता.


'एमडीएच'ची वार्षिक उलाढाल 1500 कोटींच्याही वर आहे. त्यांच्या कंपनीकडे 15 कारखाने असून 1000 डिलर्सचं जाळं आहे.


महाशय धर्मपाल गुलाटींना त्यांच्या मसाले उद्योग क्षेत्रातील यशासाठी मार्च 2019 मध्ये 'पद्म भूषण' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार धर्मपाल गुलाटी यांना प्रदान करण्यात आला होता.


एमडीएचची सुरुवात छोट्या स्तरपासून झाली असली तरी कंपनीचा आजचा व्याप प्रचंड मोठा आहे. देशातल्या मसाला बाजारात कंपनीचा वाटा 12 टक्के आहे. कंपनी 62 प्रकारची उत्पादनं तयार करते. ही सर्व उत्पादनं 150 पॉकेट्समध्ये उपलब्ध आहेत.


धर्मपाल गुलाटी हेच कंपनीचे सीईओ आहेत. त्याचं वार्षिक वेतन पाहून कुणालाही आर्श्चयाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. तीन वर्षांपूर्वी त्यांचं वार्षिक वेतन हे 24 कोटी रुपये होतं. त्याचबरोबर कंपनीत त्यांचा 80 टक्के हिस्साही आहे. आपल्या वेतनामधला 90 टक्के हिस्सा आपण सामाजिक कार्यासाठी देतो असा त्यांचा दावा आहे.


डोक्यावर खास फेटा आणि रूबाबदार राहणी हे धर्मपाल यांचं खास वैशिष्ट्यं. त्यामुळेच त्यांना एमडीएच वाले दादाजी असंही म्हणतात. तर काही लोक त्यांना महाशय या नावानेही ओळखतात.


धर्मपाल यांनी गेल्या 60 वर्षांमध्ये दिल्लीत 20 शाळा आणि अनेक हॉस्पिटल्स उघडली आहेत. त्यांची कंपनी कंत्राटी शेतीही करते. त्यात मसाल्याची उत्पादनं घेतली जातात. कर्नाटक, राजस्थान त्याचबरोबर इराण आणि अफगाणिस्तामधूनही त्यांची कंपनी मसाल्यासाठीचा माल खरेदी करते.


धर्मपाल यांना एक मुलगा आणि सहा मुली आहेत. मुलगा हा आता सगळा व्यवहार सांभाळतो. तर सहा मुली विभागवार कंपनीचा वितरण व्यवसाय सांभाळतात.


धर्मपाल यांचं शिक्षण फक्त पाचवी पर्यंतच झालं आहे. वडिलांपेक्षा वेगळा व्यवसाय करून त्यांना यशस्वी व्हायचं होतं. त्यामुळं त्यांनी अनेक व्यवसाय करून बघितले. पण त्यांना यश आलं नाही.


आर्यसमाजाचे अनुयायी - धर्मपाल गुलाटी हे आर्यसमाजाचे कट्टर अनुयायी आहेत. राजधानी नवी दिल्लीत त्यांच्याच पुढाकाराने 2018 मध्ये विश्व आर्यसमाज संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनात जगभरातल्या अनेक देशांमधून आर्यसमाजचे अनुयायी आले होते.