

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी निधन झाले. गेली काही महिने गोव्यातच निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू होते.


प्रकृती ठीक नसतानाही ते मुख्यमंत्री कार्यालयात कामकाज बघत होते. मात्र काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत गेली. रविवारी त्यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना श्वास घेण्यासही अडचण होत होती. शेवटी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली.


मनोहर पर्रिकर हे भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते ज्यांनी 2013 साली म्हटलं होतं की, 'गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा करायला हवं.'


अतिशय प्रामाणिक, साधी राहणी आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले पर्रिकर हे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री होते. 2014 च्या निवडणुका झाल्यानंतर मोदींनी त्यांना खास दिल्लीत बोलावून घेतलं होतं.