

आतापर्यंत पडद्यामागे असलेल्या प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात उतरल्या आहेत. काँग्रेसने त्यांना पक्षाच्या महासचिव पदाची जबाबदारी दिली आहे. त्याशिवाय प्रियांका गांधींकडे उत्तर प्रदेशातील पूर्व भागही देण्यात आला आहे.


प्रियांका गांधींना हिंदी साहित्याची आवड आहे. त्याबद्दल प्रियांका अमिताभ बच्चन यांच्या आई तेजी बच्चन यांचे आभार मानतात. आपल्या हिंदीचं श्रेय तेजी बच्चन यांनाच जातं असं त्यांनी मुलाखतीत सांगितलं होतं.


गांधी आणि बच्चन कुटुंबीयांचे जुने हितसंबंध आहेत. अमिताभ बच्चन यांनी अलाहाबाद (आताचे प्रयागराज) येथून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. 1987 ला बच्चन यांनी राजीनामा दिल्यानंतर मात्र या दोन्ही कुटुंबात दुरावा आला आहे.


प्रियांका गांधी यांनी त्यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील मॉडर्न स्कूल ऑफ जिजस अॅण्ड मेरी इथं घेतलं आहे.


माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राहुल आणि प्रियांका यांचं शिक्षण घरीच सुरू झालं. त्यानंतर त्यांना बाहेर लोकांमध्ये वावरण्यास मज्जाव केला गेला. सतत 24 तास सुरक्षा रक्षकांच्या गराड्यातच रहावं लागायचं.


प्रियांका गांधींची तुलना लोक इंदिरा गांधी यांच्याशी केली जाते. त्यांचं दिसणं आणि वागणं सारखं असल्यानं लोकांना त्यांच्यात इंदिराजींची प्रतिमा दिसते. इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा प्रियांका 12 वर्षांच्या होत्या.


प्रियांका गांधींनी अनेकदा म्हटलं आहे की, आजी इंदिरा गांधींचा माझ्या व्यक्तिमत्वावर जास्त प्रभाव आहे. प्रियांका गांधींनी 16 व्या वर्षी पहिलं सार्वजनिक भाषण दिलं होतं.


राजीव गांधींच्या निधनानंतर प्रियांका गांधींनीच कुटुंबाला आधार दिला. त्यांनी प्रत्येकवेळी आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधी यांना साथ दिली.


प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वड्रा यांची भेट झाली तेव्हा त्या 13 वर्षांच्या होत्या. त्यानंतर पुढे जेव्हा त्यांच्यात प्रेम झाले तेव्हा प्रियांका गांधींनी कुटुंबियांना याची माहिती दिली. प्रियांका आणि रॉबर्ट यांचं 1997 मध्ये लग्न झालं.