

जयपूर घराण्याची राजकुमारी दीया कुमारीनं आपला पती नरेंद्र कुमारसोबत घटस्फोट घेतलाय. दोघांचं लग्न जयपूरमध्ये नाही तर देशभर गाजलं होतं. दीया कुमारीनं सर्वसामान्य नरेंद्र कुमारशी लग्न केलं होतं. दोघांनी गुपचूप कोर्ट मॅरेज केलं. तिच्या घरून खूप विरोध झाला होता. पण आता 21 वर्षांनी दोघांनी घटस्फोट का घेतला?


राजकुमारी दीया भाजपची आमदार होती. पण यावेळी कौटुंबिक कारणांमुळे तिनं निवडणूक लढवायला नकार दिला होता. गेली चार-पाच वर्ष दीया आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. दोघांमध्ये वाद होते. म्हणून त्यांनी आपले रस्ते बदलले. पण एकेकाळी दीयानं जगाशी भांडून सर्वसामान्य नरेंद्र कुमारशी लग्न केलं होतं.


21 वर्षांपूर्वी त्यांची प्रेमकहाणी जगासमोर आली, तेव्हा कळलं होतं की तिनं आई-वडिलांच्या मनाविरुद्ध लग्न केलं होतं. नरेंद्र कुमार अकाऊंट डिपार्टमेंटमध्ये काम करायचा. मीडियानं तर तो ड्रायव्हर होता, असंही म्हटलेलं. दीया कुमारीनं नंतर आपल्या ब्लाॅगमधून हा गैरसमज दूर केला होता. दीया कुमारी महाराज सवाई भवानी सिंह आणि पद्मिनी देवी यांची एकुलती एक लेक. दीया कुमारीचं शिक्षण दिल्लीच्या माॅडर्न स्कूल आणि जयपूरच्या महाराणी गायत्री देवी गर्ल्स पब्लिक स्कूलमधून झालं. नंतर ती लंडनला पुढील शिक्षणासाठी गेली होती.


दीया कुमारी आणि नरेंद्र कुमार यांना दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. दीया आपल्या कौटुंबिक सिटी पॅलेस, जयगढ किल्ला यांच्या संवर्धनाचं काम पाहते. दीयाचं लग्न 1997मध्ये झालं होतं.


दीया कुमारीनं आपल्या ब्लाॅगमध्ये लिहिलं होतं, नरेंद्र कुमार त्यांचा ड्रायव्हरही नव्हता किंवा अकाऊंटंटही. ते दोघं भेटले आणि तिनं नरेंद्र कुमारना जीवनसाथी बनवण्याचा निर्णय घेतला. दीयानं लिहिलं होतं, तिच्या घरच्यांनी तिला मोकळेपणे वाढवलं होतं. ती राजघराण्याची असली तरी तिचे मित्रमैत्रिणी सर्वसामान्य घरातले होते.


दीयानं ब्लाॅगमध्ये लिहिलं होतं, माझे पती सीए होते. अनुभव मिळवण्यासाठी ते एसएमएस म्युझियमच्या अकाऊंट डिपार्टमेंटमध्ये काम करत होते. नंतर त्यांनी स्वत:चा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस सुरू केला. लोकांना वाटायचं माझ्या आई-वडिलांनी मदत केली. पण तसं काही नव्हतं.


राजकुमारीनं ब्लाॅगमध्ये लिहिलं होतं, अकाऊंट डिपार्टमेंटमध्ये माझी आणि त्यांची ओळख झाली. ते खूप केअरिंग होते. आमची पहिली भेट महालातच झाली. मला त्यांच्या सोबत छान वाटत होतं.


दीया लिहिते, आमचं काही फर्स्ट लव्ह नव्हतं. आमची ओळख झाली, तेव्हा नरेंद्र इथून गेले होते. मग आम्ही काॅमन फ्रेंड्सच्या घरी भेटायला लागलो. मी जेव्हा परदेशात गेले होते, तेव्हा त्यांना खूप मिस केलं. नरेंद्र माझ्या कायमच जवळ असावेत असं वाटलं. तेव्हा जाणवलं, ही फक्त मैत्री नाही. मी माझ्या आईला ही गोष्ट सांगितली. तिला धक्का बसला. माझ्या आई-वडिलांना माझं लग्न राजघराण्यात व्हावं असं वाटत होतं.


दीया पुढे लिहिते, माझ्या घरी माझ्यासाठी मुलं पाहायला सुरुवात झाली. मी खूप जणांना भेटले. पण मला कोणातही रस वाटला नाही. दम्यान, मी आणि नरेंद्र पाच-सहा महिने एकमेकांपासून दूर राहिलो. पण त्यामुळे आमच्यातलं प्रेम जास्त घट्ट झालं आणि लग्नाचा निर्णय पक्का झाला.


1994मध्ये दोघांनी आर्य समाज पद्धतीनं लग्न केलं. पण घरी सांगितलं नाही. त्यानंतर 1996मध्ये दीयानं आपल्या आईला या लग्नाची बातमी दिली. सगळ्यांना खूप नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.


इतक्या फिल्मी चढउतारानंतर दीया कुमारी आणि नरेंद्र यांचं 1997मध्ये थाटामाटात लग्न झालं. दोघांचं एक गोत्र असल्यानं राजपुतांचा या लग्नाला विरोध होता. दीयाच्या वडिलांना महासभेचं अध्यक्षपद सोडावं लागलं होतं.