तुम्ही सडलेलं धान्य तर खात नाही ना? रंग मारून, ब्रँडेड म्हणून होतेय निकृष्ट गव्हाची विक्री
एका ऍग्रो प्लांटमध्ये सडलेल्या गव्हावर नकली गोल्डन रंग मारून, तो ब्रँडेड-चांगल्या प्रतिचा असल्याचं सांगत विकला जात होता. एका तक्रारीनंतर अन्न आणि औधष विभागाच्या टीमने प्लांटवर छापा मारला. या छापेमारीमध्ये मोठ्या प्रमाणात गहू आणि रंग करण्याचं सामान आढळलं आहे.


दर्शिल ऍग्रो प्लांटमध्ये जवळपास 30 किलोची, 25 हजार गव्हाची पोती जप्त करण्यात आली आहेत. त्याशिवाय 50 किलो गोल्डन रंगही या प्लांटमध्ये आढळला. गव्हावर अशाप्रकारे रंग मारण्याचं हे प्रकरण पहिल्यांदाच समोर आलं आहे.


सडलेल्या गव्हावर, हानिकारक गोल्डन रंग मारून तो बेस्ट क्वालिटीचा, ब्रँडेड सांगून बाजारात सप्लाय केला जात होता. हा गहू अमूल, सुपर किंग, जलसा, वंडर अशा जवळपास 11 ब्रँड्समध्ये पॅक करून, हे नमुने तपासणीसाठी भोपाळला पाठवण्यात आले आहेत.


मध्यप्रदेशातील नीमचमध्ये हा प्रकार उघड झाला. जिल्हा अन्न आणि औधष विभाग अधिकारी संजीव मिश्रा यांनी सांगितलं की, प्लांटमध्ये ठेवण्यात आलेल्या गव्हाचे 5 प्रकारचे नमुने घेण्यात आले. हे गहू वेगवेगळ्या ब्रँड्सच्या नावाने पॅक करण्यात आले होते. गव्हाच्या अनेक मोठ्या ब्रँड्सच्या नावे हा माल भरला गेला होता.


मोठ्या ब्रँड्सच्या पॅकेटमध्ये हा कलर मारलेला हानिकारक गहू विकला जात होता. काही गव्हावर गोल्डन, तर काही पॅकेटमधील गव्हावर केशरी कलर सोल्युशनही मिळालं आहे. हा एकूण माल जवळपास 27 लाख 78 हजार किंमतीचा असल्याचं सांगितलं जात आहे.


तपासणीसाठी गव्हाचे नमुने भोपाळला पाठवण्यात आले आहेत. तसंच प्लांट सील करण्यात आला आहे. तपासादरम्यान हा गहू प्रमाणित नसल्याचं आढल्यास, दर्शिल ऍग्रोविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.