केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी 2021-22चा अर्थसंकल्प (Budget) सादर करण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कोरोनानंतरच्या या अर्थसंकल्पाबाबत जनतेला खूप अपेक्षा आहे. हा अर्थसंकल्प तयार करण्यामध्ये निर्मला सीतारमण यांच्या टीमची खूप मोठी भूमिका असते. आज आपण त्यांच्या टीममधील सदस्यांविषयी जाणून घेणार आहोत.
कृष्णमूर्ती सुब्रमण्यम : कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी अर्थशास्त्रात पीएचडी मिळवली आहे. यूनिव्हर्सिटी ऑफ शिकागो बूथ स्कूल ऑफ बिजनेसमध्ये प्राध्यापक लुगी जिंगेल्स आणि रघुराम राजन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएचडी पूर्ण केली आहे. 2018 मध्ये मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांची नियुक्ती करण्यात आली होती. ते बँकिंग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक धोरणातील तज्ज्ञ आहेत.
टी. व्ही सोमनाथन : टी. व्ही सोमनाथन खर्च विभागाचे सचिव आहेत. त्यांनी जागतिक बँकेत काम केले आहे. तसंच त्यांनी सहसचिव म्हणून पंतप्रधान कार्यालयात काम केले आहे. सोमनाथन 1987 च्या बॅचचे तामिळनाडू केडरचे आयएएस अधिकारी आहेत. 2015 मध्ये सोमनाथन यांनी सहसचिव म्हणून पंतप्रधान कार्यालयात काम केले. त्यांनी कोलकाता विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी मिळवली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सोमनाथन यांच्यावर खर्चावर अंकुश ठेवण्याचे आव्हान असेल.
अजय भूषण पांडे : महसूल सचिव अजय भूषण पांडे महाराष्ट्र केडरचे 1984च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. भारतीय अद्वितीय ओळख प्राधिकरणाचे (यूआयडीएआय) ते सीईओ होते. यूआयडीएआयमध्ये स्वत:ला सिद्ध केल्यानंतर पांडे यांचे लक्ष महसूल आघाडीवर छाप सोडण्यावर आहे. पांडे यांनी आयआयटी कानपूरमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. तर मिनेसोना युनिव्हर्सिटीतून त्यांनी कम्प्यूटर सायन्समध्ये पीएचडी मिळवली. पांडे यांच्यावर आरोग्य आणि संरक्षणावर खर्च करण्यासाठी महसूल वाढवण्याची आणि महामारीमध्ये आयकराचा दर कमी ठेवत शिल्लक ठेवण्याची जबाबदारी आहे.
तरुण बजाज : तरुण बजाज हे अर्थ मंत्रालयात आर्थिक व्यवहाराच्या विभागात सचिव आहेत. अर्थ मंत्रालयात रुजू होण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान कार्यालयात काम केले आहे. ते 1988 च्या बॅचचे हरयाणा कॅडरचे आयएएस आधिकारी आहेत. त्यांनी अनेकदा मदत निधीवर काम केले आहे. आत्मनिर्भर भारत पॅकेजला तयार करण्यात तरुण बजाज यांची महत्वपूर्ण भूमिका आहे.
देबाशीष पांडा : देबाशीष पांडा वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव आहेत. आर्थिक क्षेत्राशी जोडलेल्या अर्थसंकल्पातील सर्व घोषणा त्यांच्या जबाबदारीखाली येतात. ते 1987 च्या बॅचचे उत्तर प्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. आर्थिक व्यवस्थेची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी आरबीआयकडे लक्षपूर्वक काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.