उत्तर भारतातील लोक उष्णतेने त्रस्त आहेत. राजधानी दिल्लीत पारा 49 अंशांच्या पुढे गेला आहे. इथे लोक पावसाची वाट पाहत आहेत. मात्र दुसरीकडे कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये पावसाने लोकांचे हाल केले. मंगळवारच्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात वीज गेली आहे.
इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानुसार, मंगळवारी रात्री मुसळधार पावसानंतर बेंगळुरूमध्ये पाइपलाइनवर दोन कामगार मृतावस्थेत आढळले. देव भरत (बिहार) आणि अंकित कुमार (उत्तर प्रदेश) अशी मृतांची नावं आहेत. पाऊस सुरू होताच कामगार पाइपलाइनमध्ये घुसले होते आणि सायंकाळी सात वाजेपर्यंत पाण्याची पातळी वाढल्यानं दोघांचाही मृत्यू झाला.
मंगळवारी बंगळुरूमध्ये सुरुवातीला पावसामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण आलं. मात्र, पावसानं जोरदार आघाडी उघडल्यामुळं पाणी साचून जनजीवन विसकळीत झालं. रहिवासी भागात पाणी तुंबलं आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. अनेक भागात सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे.
मुसळधार पावसाचा बंगळुरू मेट्रोवरही परिणाम झाला. वादळामुळे ग्रीन लाईन मिनिस्टर मॉल स्टेशनवर वीजपुरवठा खंडित झाला होता. ट्रान्सफॉर्मर ट्रिप झाल्यामुळे मेट्रोची वाहतूक काही काळ थांबवावी लागली. पर्पल लाईनवरील गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. मात्र, नंतर गाड्या सुरू झाल्या. खराब हवामानाचा परिणाम विमान कंपन्यांवरही झाला. राजमुंद्री आणि कोलकाता येथून दोन उड्डाणे चेन्नईकडे वळवावी लागली.
कर्नाटकात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने आधीच दिला होता. पुढील दोन दिवस कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. दक्षिण-पश्चिम मान्सूनचा प्रभाव अंदमान-निकोबारमध्ये पोहोचल्याने अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला होता.त्यासाठी विभागाने ऑरेंज अलर्टही जारी केला होता. पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.