21 व्या वर्षी महापौर होत फडणवीसांचं रेकॉर्ड मोडणारी देशातली सर्वांत तरुण मेयर आहे कोण?
Thiruvanantpuram mayor - गणिताची विद्यार्थिनी असणाऱ्या आर्या राजेंद्रनचे आई-वडील अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतले आहेत आणि कुठलाही मोठ गॉडफादर किंवा राजकीय वारसा नसताना तिने हे यश मिळवलं आहे.


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे काही वर्षांपूर्वीपर्यंत देशातला सर्वांत तरुण महापौर असा विक्रम झाला होता. फडणवीस (Devendra Fadnavis) नागपूर महापालिकेचे नगरसेवक 21 व्या वर्षीच झाले होते आणि तेही एक रेकॉर्डच होतं. पण आता मात्र केरळच्या (Thiruvananthapuram) एका तरुणीने फडणवीस आणि त्यानंतरच्या इतर तरुण महापौरांवर मात करत 21 व्या वर्षीच मेयर पद (Youngest mayor in India) मिळवण्याचा विक्रम केला आहे.


केरळची राजधानी तिरुवनंतपुरम. या शहराच्या महापालिकेच्या महापौर म्हणून आर्या राजेंद्रन (Arya Rajendran) यांची निवड झाली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या CPI (M)सदस्य असलेल्या आर्या राजेंद्रन देशातल्या आतापर्यंतच्या सर्वात तरुण मेयर ठरल्या आहेत.


आर्या राजेंद्रन यांचं तिरुवनंतपुरमच्या ऑल सेंट्स कॉलेजमध्ये शिक्षण सुरू आहे. त्या येथे BSc (Mathematics)च्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहेत. त्यांनी BSc ची पदवी घेण्याअगोदरच त्या शहराच्या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत.


स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (SFI)या विद्यार्थी संघटनेत आर्या कार्यरत होत्या. SFI च्या पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. आर्या यांनी महापालिकेची निवडणूक (Local Body Polls in 2020) पहिल्यांदाच लढवली. CPIM च्या जिल्हा सचिवालयानेच त्यांच्या उमेदवारीची शिफारस केली होती. तिरुवनंतपुरमच्या मुदवनमुगल (Mudavanmugal)वॉर्डातून त्या निवडून आल्या. एवढ्या लहान वयात नगरसेवक होण्याची संधी त्यांना मिळाली. पण त्याहून मोठा मान त्यांना शुक्रवारी मिळाला, जेव्हा त्यांची महापौरपदासाठी निवड झाली.


महाराष्ट्रात हा मान देवेंद्र फडणवीस यांना 1997 साली मिळाला होता. नागपूर महापालिकेचे सर्वांत तरुण महापौर म्हणून त्यांची निवड झाली होती. त्या वेळी फडणवीस यांचं वय 27 वर्षं होतं. त्याअगोदर आर्या राजेंद्रन यांच्याप्रमाणेच वयाच्या 21 व्या वर्षी ते नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकून नगरसेवक झाले होते.