मुंबईच्या प्रभादेवी परिसरातील मनीष कमर्शियल सेंटर इमारतीत पाचव्या माळ्यावर अचानक स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या स्फोटामुळे इमारतीचा काही भाग हा खचून बाहेर रस्त्यावर पडला आहे. या स्फोटाच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रस्त्यावर डेब्रिजचा खच्च पडला आहे असल्यामुळे या भागात सध्या वाहतूक मंद गतीने सुरू आहे. सुदैवाने या स्फोटात मोठी जीवितहानी झाली नाही. या स्फोटात 30 वर्षीय महिला जखमी झाली आहे. तिच्या पायाला आणि डोक्याला मार लागला असून तीने रुग्णालयात जायला नकार दिला आहे. इतर सर्वजण सुखरूप आहेत. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे. नेमका हा स्फोट कशामुळे आणि का झाला याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.