सोमवारपासून मुंबई आणि मुंबई उपनगरात पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. कुर्ला पूर्व नेहरूनगर, कुर्ला पश्चिम एलबीएस रोड, चेंबूर, टिळकनगर, विद्याविहार या भागात पाणी मोठ्या प्रमाणात साचण्यास सुरूवात झाली आहे. पुढील चार ते पाच दिवसांत मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाजही भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मुंबईच्या वांद्रे परिसरातही पावसामुळे पाणी साचल्यामुळे त्यामुळे वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. वाहनधारकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. जर असाच पाऊस पडत राहिला तर सखल भागात पाणी साचल्याशिवाय राहणार नाहीत, असे काही अनुभवी लोक सांगत आहेत. मुंबईच्या मरीन लाईन्स परिसरातही पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
मंगळवारी सकाळी 8.30 पर्यंत (मागील 24 तासांत) सांताक्रूझमध्ये 124.2 मिमी, कुलाब्यामध्ये 117.4 मिमी, सीएसएमटी 95 मिमी, भायखळा 92.5 मिमी, चेंबूर 99.5 मिमी, माटुंगा 0.5 मिमी, शीव 66 मिमी, विद्याविहार 99 मिमी, जुहू विमानतळ 101.5 मिमी, मुंबई विमानतळ 94 मिमी पावसाची नोंद झाली. एलबीएस मार्गावर पावसामुळे पाणी साचलंय. एलबीएस मार्गावर वाहतूक मंदावली आहे.
शीव रस्ता क्रमांक 24 येथे अतिवृष्टीमुळे पाणी साचल्यामुळे बस मार्ग क्र. 341, 411, 22, 25, 312 चे विद्यमान प्रवर्तन शीव रस्ता क्रमांक 3 मार्गे सकाळी 9.30 वाजल्यापासून परावर्तीत करण्यात आले आहे. कल्याण पूर्व भागातील हनुमाननगरमधल्या टेकडीची दरड कोसळली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात कालपासून मूसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळेच ही दरड कोसळली आहे.