सरकारकडून पेन्शनर्ससाठी दिवाळी गिफ्ट; केवळ ७० रुपयांत घ्या या सेवेचा लाभ
सेवानिवृत्त कर्मचारी, चालण्या-फिरण्यास असमर्थ असणाऱ्या पेन्शनर्ससाठी सरकारने खास सुविधा आणली आहे. पोस्ट विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकने पेन्शनधारकांसाठी एका बायोमेट्रिक आधारित सेवेची सुरूवात केली आहे. पोस्टमन घरी येऊन केवळ पाच मिनिटांत बायोमेट्रिकद्वारे जीवन प्रमाणपत्र काढून देऊ शकेल.


दिव्यांग आणि वृद्ध पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र अर्थात लाईफ सर्टिफिकेट काढण्यासाठी पोस्ट ऑफिस जाण्याची गरज नाही. इंडियन पोस्टल पेमेंट बँक घरीच ही सुविधा देत आहे. पोस्टमन संबंधित व्यक्तीच्या घरी डिजिटल प्रमाणपत्र बनवून देईल.


पोस्ट विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकने पेन्शनर्ससाठी पोस्टमनच्या माध्यमातून डिजिटल जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी डोरस्टेप सर्व्हिसची यशस्वी सुरूवात केली आहे.


केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इतर सरकारी संस्थांचे पेन्शनर्स या सेवेचा लाभ घेऊ शकतात. तुमच्या बोलवण्यानुसार, पोस्टमन केवळ पाच मिनिटात बायोमेट्रिक जीवन प्रमाणपत्र काढून देईल. त्यासाठी ७० रुपये भरावे लागतील.


या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पेन्शनधारकांकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. त्याशिवाय पीपीओ नंबर, मोबाईल नंबरही पोस्ट विभागत द्यावा लागेल. पोस्टमन आधार कार्डच्या माध्यमातून डिजिटल प्रमाणपत्र काढून देईल. त्यानंतर ते संबंधित विभाग किंवा बँकेत अपडेट होईल.


India Post Payments Bank डोरस्टेप बँकिंग सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपल्या राष्ट्रीय नेटवर्कचा वापर करत आहे. यात पोस्ट ऑफिसचे १,३६,००० हून अधिक ऍक्सिस पॉईंट्स आणि स्मार्टफोन तसंच बायोमेट्रिक उपकरणांनी युक्त १,८९,००० पोस्टमन आहेत. यासुविधेंतर्गत देशभरातील मोठ्या संख्येने निवृत्त वेतनधारक बँकेच्या शाखेत भेट न देता, यासाठी रांगा न लावता पोस्टमनद्वारे या डोरस्टेप सेवेचा लाभ घेऊ शकतील.