दिवाळीपर्यंत PF खात्यात येणार आहेत व्याजाचे पैसे, असा तपासा तुमच्या खात्यातील बॅलन्स
एप्रिल ते ऑगस्टदरम्यान EPFO ने एकूण 94.41 लाख क्लेम्सची सेटलमेंट केली आहे. या क्लेम्सच्या माध्यमातून एकूण मिळून पीएफ सदस्यांना (PF Members) 35,445 कोटी रुपये देण्यात आले आहेत. आता 8.50 टक्के मिळणारे व्याजाचे पेमेंट ही सामान्य माणसासाठी आनंदाची बाब आहे.


कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून अशी माहिती देण्यात आली आहे की, दिवाळीपर्यंत पीएफ खातेधारकांच्या खात्यामध्ये 31 मार्च 2020 पर्यंतच्या व्याजाची रक्कम जमा केली जाईल. EPFO च्या केंद्रीय बोर्डाने याबाबत माहिती दिली. हे व्याज सुरुवातीला 8.15 टक्के आणि नंतर 0.35 टक्के असे विभागले जाईल. अशावेळी तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीने पीएफ तपासू शकता वाचा इथे


मीडिया अहवालांच्या मते, दिवाळीपर्यंत 8.15 टक्के व्याजाची रक्कम देण्यात येईल. त्यानंतर डिसेंबरपर्यंत उर्वरित 0.35 टक्के व्याज दिले जाईल. कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे EPFO च्या कमाईवर परिणाम झाला आहे. दरम्यान या कारणास्तर ईपीएफओ बोर्डाने केंद्राने व्याजदर 8.5 टक्के ठेवण्याची शिफारस केली होती


कामगार मंत्रालयाने अशी माहिती दिली आहे की, 8.50 टक्के व्याजापैकी 8.15 टक्के कर्जातून होणाऱ्या कमाईमार्फत दिले जाईल. तर 0.35 टक्के ही रक्कम ETF (Exchange Traded Fund) च्या विक्रीतून देण्यात येईल.


एसएमएसच्या माध्यमातून- SMS च्या माध्यमातून तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्हाला हा मेसेज करावा लागेल. ENG म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. परंतू तुम्हाला अन्य कोणत्या भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेची पहिली तीन अक्षरं तुम्हाला टाकावी लागतील. हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मलयाळम आणि बंगाली भाषेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी ईपीएफओ मध्ये तुमचा नंबर रजिस्टर्ड असणे अनिवार्य आहे.


मिस्ड कॉल- Missed Call च्या माध्यमातून ईपीएफ रक्कम तपासण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर UAN बरोबर रजिस्टर्ड असणे गरजेचे आहे. तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 यावर मिस्ड कॉल करावा लागेल. यानंतर तुम्हाला मेसेजच्या माध्यमातून तुमच्या खात्यातील रकमेची माहिती मिळेल


ईपीएफओ अॅप- ईपीएफओ अॅप ‘m-EPF’ डाऊनलोड करा. ते उघडल्यानंतर 'Member' वर क्लिक करा. त्यानंतर 'Balance/Passbook' ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा. याठिकाणी तुमचा UAN क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर टाकून तुम्ही ईपीएफमध्ये जमा असणारी रक्कम तपासू शकता.


EPFO वेबसाइट- EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर देखील लॉग इन करून तु्म्ही पीएफ बॅलन्सबाबत माहिती मिळवू शकता. यासाठी तुम्हाला UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड भरावा लागेल. सर्व डिटेल्स दिल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी तुम्हाला मेंबर आयडी निवडावा लागेल. याठिकाणी ई-पासबुकवर ईपीएफ बॅलन्स पाहता येईल.