

धनत्रयोदशीच्या काही दिवस आधीच सोन्याचे भाव वधारले आहेत. नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत सोन्याचा भाव 1633 रुपयांनी वाढला आहे. चांदीचे भावही या महिन्यात वाढले आहेत. चांदीच्या दरात 5919 रुपये प्रति किलोग्रम वाढ झाली आहे.


जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत नव्या राष्ट्रपतींच्या निवडीसह, आर्थिक प्रोत्साहन पॅकेज जाहीर करण्याच्या आशेने पिवळ्या धातूच्या किंमती वाढल्या आहेत. केवळ घरगुती बाजारातच नाही, तर आंतराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1950 डॉलर प्रति औंस आहे. तर चांदीचा भावही 25.44 डॉलरच्या जवळपास आहे.


केडिया ऍडव्हायजरीचे डायरेक्टर, अजय केडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 52000 ते 54000 दरम्यान असू शकतो. त्याशिवाय, जो बायडन यांच्या राष्ट्राध्यक्ष निवडीनंतर शेअर बाजारात दबाव वाढण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले.


सोन्याच्या किंमती वाढण्यामागे कारणं : कोरोनाचे वाढते रुग्ण आणि त्याबाबत असलेलं अनिश्चिततेचं वातावरण हे सोने दरवाढीचं कारण ठरू शकतं. अशात केंद्रीय बँका सोन्याची अधिक खरेदी करत आहेत. अमेरिका-चीन व्यापार तणाव आणि भारत-चीन संघर्ष हेदेखील सोन्याच्या वाढत्या किंमतींमागील कारण ठरत असल्याचं बोललं जात आहे.