Gold Hallmarking New Rules: तुम्ही नवीन आर्थिक वर्षात सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आजपासून सोने खरेदी करणाऱ्यांना नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नियमात बदल करत केंद्र सरकारने आजपासून सोन्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य केलेय.
4 मार्च 2023 रोजी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, आता फक्त 6 क्रमांकाचे हॉलमार्क वैध असणार आहे. पूर्वी 4 अंकी आणि 6 अंकी हॉलमार्कबाबत खूप कन्फ्यूजन व्हायचे. आता कन्फ्यूजन दूर करत ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, केवळ 6 क्रमांकांचे अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग वैध असतील. हे नसेल तर कोणताही दुकानदार दागिने विकू शकणार नाही. सरकार गेल्या दीड वर्षांपासून देशात बनावट दागिन्यांची विक्री रोखण्यासाठी नवीन हॉलमार्किंग नियम लागू करण्याच्या प्रयत्नात आहे. आता आजपासून ते अनिवार्य करण्यात आले आहे.
काय होणार फायदा? महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही दागिन्यांची शुद्धता ओळखण्यासाठी त्याला 6 अंकी अल्फान्यूमेरिक कोड दिला जातो. याला हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) क्रमांक म्हणतात. या नंबरद्वारे तुम्हाला या दागिन्यांची सर्व माहिती मिळेल. हा क्रमांक स्कॅन केल्याने ग्राहकांना बनावट सोने किंवा भेसळयुक्त दागिने टाळण्यास मदत होते. हे सोन्याच्या शुद्धता प्रमाणपत्रासारखे आहे.
जुने दागिने विकण्यास परवानगी : 1 एप्रिल 2023 पासून सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आलीये. जर ग्राहक जुने दागिने विकायला गेले तर त्यांना त्यासाठी हॉलमार्किंगची गरज भासणार नाही. लोकांकडून जुन्या दागिन्यांच्या विक्रीच्या नियमामध्ये सरकारने कोणताही बदल केलेला नाही. जुने दागिने 6 अंकी हॉलमार्कशिवाय विकले जाऊ शकतात.