

तुम्ही टॅक्स वाचवण्यासाठी कुठे ना कुठे गुंतवणूक करता. जर केली नसेल तर ३१ मार्चपूर्वी करा नाहीतर तुम्हाला जास्त कर भरावा लागेल. मुलीच्या भविष्यासाठी चांगली गुंतवणूक करण्यासाठी एक योजना सरकारने सुरू केली आहे. यामुळे करही वाचेल आणि मुलीच्या भविष्यासाठी पैसैही राहतील.


मुलींसाठी असलेल्या या योजनेचे नाव सुकन्या समृद्धी योजना असं आहे. 1 जानेवारी 2019 पासून या योजनेवर तुम्हाला 8.5 % दराने व्याज मिळेल. सुकन्या समृद्धी योजनेत पैसे जमा केल्यास आयकर अधिनियम कलम 80 सी नुसार दीड लाख रुपयांपर्यंत डिडक्शनचा फायदा मिळतो.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेटी बचाओ-बेटी पढाओ अंतर्गत सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात 4 डिसेंबर 2014 ला केली होती. या योजनेत मुलीच्या नावाने बचत खाते उघडल्यास त्याचा फायदे घेता येतो. सर्वसामान्य लोकांचा विचार करुन वर्षाला कमीत कमी 1 हजार रुपये जमा करण्याची मर्यादा 250 रुपये इतकी केली आहे.


मुलीच्या जन्मापासून लग्नापर्यंत तिच्या खर्चाचा भार कमी करण्यास या योजनेची मदत होते. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे. त्याशिवाय मुलीच्या शिक्षणाच्या आणि लग्नाच्या खर्चासाठी या योजनेत गुंतवलेल्या पैशांची मदत होते.


सुकन्या समृद्धी योजनेचं खातं कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या अधिकृत शाखेत उघडता येतं. ज्या बँकमध्ये पीपीएफ खातं उघडता येते तिथं सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडता येतं.


सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खातं उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज मिळतो. या खात्यासाठी मुलीच्या जन्माचा दाखला, आई-वडील किंवा पालकांचे ओळखपत्र, शिधापत्रिका, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट आणि घराच्या पत्त्याचा पुरावा म्हणून वीजबील किंवा फोन बील ही कागदपत्रे द्यावी लागतात.


या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी नेट बँकिंगचा वापर करता येतो. खातं जिथं उघडलं आहे तिथल्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत पासबूक मिळतं.


मुलीचे आई-वडील किंवा पालकांना खातं उघडता येतं. एका मुलीच्या नावावर एकच खातं उघडू शकतात. एकूण दोन मुलींच्या नावावर खातं उघडून या योजनेचा लाभ घेता येतो.