रिझर्व्ह बॅंकेतर्फे डेबिट, क्रेडीट कार्डच्या नियमात बदल : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच डेबिट, क्रेडीट कार्डच्या नियमातील बदलांबाबत घोषणा केली होती. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच म्हणजे एक जानेवारी 2021 पासून हा नवीन नियम देशभरात लागू होणार आहे. आतापर्यंत केवळ दोन हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार पिनक्रमांकाशिवाय करता येत होते, आता ही मर्यादा आता पाच हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. एक देश एक कार्ड (One Nation One Card) योजनेअंतर्गत ‘रूपे’(RuPay) या भारतीय कंपनीची डेबिट, क्रेडीट कार्ड्स दाखल करण्यात आली होती. याच्याआधारे ग्राहकांना बसच्या तिकीटापासून ते शॉपिंग मॉलमधील खरेदीपर्यंत सर्व व्यवहार करता येतात.
कॉन्टॅक्टलेस डेबिट, क्रेडीट कार्ड म्हणजे काय? ‘रूपे’द्वारे (Rupay)जारी करण्यात आलेल्या डेबिट, क्रेडीट कार्डद्वारे विशिष्ट मर्यादेपर्यंत कार्ड स्वाईप न करता, पिन क्रमांक न टाकता, पेमेंट करता येते. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (National Common Mobility Card)म्हणूनही याचा उपयोग करता येतो. मेट्रोच्या स्मार्ट कार्डप्रमाणे याचा वापर करून ग्राहक प्रवासही करू शकतात. आता देशातील सर्व बँका रूपेची नवीन डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी करतील त्यामध्ये नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (National Common Mobility Card) हे फिचर अंतर्भूत असेल. इतर कोणत्याही वॉलेट सारखे हे काम करेल.
कॉन्टॅक्टलेस ट्रान्झेक्शन : कॉन्टॅक्टलेस टट्रान्झेक्शनमध्ये (Contactless Transaction)ग्राहकांना म्हणजेच कार्ड धारकांना पैसे देण्यासाठी कार्ड स्वाईप करण्याची गरज नसते. पीओएस मशीनवर (POS Machine) कार्ड टेकवताच पेमेंट होते. यात दोन प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. एक म्हणजे निअर फिल्ड कम्युनिकेशन (NFC) आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टीफिकेशन (RFID). या तंत्रज्ञानाचा उपयोग करून कार्ड मशिनजवळ आणल्यावर पेमेंट होऊन जाते. मशिनपासून 2 ते 5 सेंटीमीटर दूर ठेवूनही पेमेंट प्रक्रिया करता येते. एका दिवसात पाच व्यवहार करता येतात. पूर्वीची 2 हजार रुपयांची मर्यादा आता पाच हजार करण्यात आली आहे. यापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारासाठी पिन क्रमांक (PIN Number) किंवा ओटीपीची (OTP) आवश्यकता असते.
कोणत्या बँका देतात असं कार्ड : देशभरातील स्टेट बँक (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) अशा 25 बँका अशी कार्ड्स उपलब्ध करतात. पेटीएम पेमेंट बँकही (Paytm Payment Bank) अशी कार्ड्स देते. एटीएमवर (ATM) याचा उपयोग केल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळतो. परदेशात मर्चंट आऊट्लेटसवर खरेदी केल्यास 10 टक्के कॅशबॅक मिळतो. डिस्कव्हर आणि डायनर्स क्लबसह परदेशातील एटीएमवर याचा उपयोग करता येतो. कार्ड हरवल्यास ताबडतोब बँकेला कळवून कार्ड ब्लॉक करावे लागेल. तुम्हाला कार्ड हरवले आहे हे लक्षात येईपर्यंत कोणी खरेदी केली तर बँक तुम्हाला त्याची नुकसानभरपाई देईल.