या कारणामुळे द्यावा लागला होता राजीनामा : आपल्या पतीला आर्थिक फायदा पोहोचवण्यासाठी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर झाला होता. आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन समूहाला 3250 कोटी रुपयांचे कर्ज दिले, असा आरोप आहे. यामध्ये त्यांनी जवळपास 86 टक्के म्हणजेच 2810 कोटी रुपये परत न केल्याचा आरोप आहे. त्यानंतर 2017 साली हे कर्ज एनपीए घोषित करण्यात आलं.
चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्याशी व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांचे व्यावसायिक संबंध असल्याचे एका बातमीत समोर आले होते. व्हिडिओकॉन समूहाच्या मदतीने स्थापन झालेल्या कंपनीचे नाव नंतर चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या नेतृत्वात पिनॅकल एनर्जी ट्रस्ट असं करण्यात आलं होतं. त्यानंतर कोचर यांच्यासह सहमालकी असलेल्या या कंपनीतून धूत यांनी कर्जाच्या रूपातील मोठा हिस्सा दुसरीकडे वळवला होता. यामध्ये 94.99 टक्के शेअर्स केवळ 9 लाख रुपये किमतीमध्ये ट्रान्स्फर करण्यात आले होते.
78 कोटी रुपयांची फसवणूक सुरुवातीला बँकेने कोचर यांच्यावरील आरोप जाहीर न करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु गुंतवणूकदार आणि राष्ट्रीय संस्थांच्या दबावामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी लागली होती. 30 मे 2018 मध्ये बोर्डाने व्हिसल ब्लोअरच्या आरोपांचा विस्तृत तपास करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश बीएन श्रीकृष्णा यांच्याकडे सोपवण्यात आला होता. जानेवारी 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा तपास पूर्ण झाला आणि चंदा कोचर दोषी आढळल्या. या वर्षाच्या सुरूवातीला ईडीने चंदा कोचर, दीपक कोचर आणि त्यांच्या मालकीच्या आणि नियंत्रित कंपन्यांच्या मालकीच्या 78 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.