तुम्हाला माहितीच आहे की, बजेटमध्ये मोठे मोठे आकडे असतात. यामुळेच अनेक लोकांना अर्थसंकल्पीय भाषण अतिशय कंटाळवाणे आणि बोरींग वाटते. ही एकसुरीपणा मोडून काढण्यासाठी अनेकवेळा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री कविता आणि म्हणींचा आधार घेतात. अर्थसंकल्प सादर करताना कोणत्या अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात काव्याचा वापर केला ते जाणून घेऊया.
2021 मध्ये देश कोरोनाचा सामना करत होते. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी कोरोना संकटाशी लढा देणाऱ्या देशासाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या ओळींचा पुनरोच्चार केला होता. त्या अशा की, 'उम्मीद एक ऐसा पक्षी है जो प्रकाश को महसूस करता है और अंधेरे में भी चहचहाता है.' यासोबतच त्यांनी तमिळ संत तिरुवल्लुवर यांची एक कविता देखील वाचली होती.
भारतातील आर्थिक सुधारणांचा मार्ग मोकळा करणारा 1991 चा अर्थसंकल्प तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी सादर केला होता. भारताच्या आर्थिक क्षमतेचे वर्णन करताना त्यांनी फ्रेंच लेखक व्हिक्टर ह्यूगो यांच्या प्रसिद्ध उद्धरणाचा उल्लेख केला. त्या अशा की, 'ज्या विचाराची वेळ आली असेल, त्याला जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही.'
2016 चा अर्थसंकल्प दिवंगत अरुण जेटली यांनी सादर केला होता. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी मोदी सरकारसमोरील आव्हानांची जाणीव करून देण्यासाठी उर्दू नझमचाही आधार घेतला. त्या ओळी होत्या की, - ‘कश्ती चलाने वालों ने जब हार कर दी पतवार हमें, लहर लहर तूफान मिलें और मौज-मौज मझधार हमें, फिर भी दिखाया है हमने और फिर ये दिखा देंगे सबको, इन हालातों में आता है दरिया करना पार हमें.’