

1 फेब्रुवारीपासून सामान्यांच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. ज्याचा सर्वसामान्यांच्या बजेटवर, थेट परिणाम होणार आहे. एटीएम, एलपीजी गॅस सिलेंडर, फास्टॅग, बँकेसंबंधी काही नियमांमध्ये बदल होणार आहेत.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करतील. यावेळी काही घोषणा करण्यात येतील, ज्यांचा थेट परिणाम सामान्यांच्या आयुष्यावर होणार आहे.


1. केंद्रीय अर्थसंकल्प - 29 जानेवारी रोजी इकॉनॉमिक सर्व्हे सादर केल्यानंतरच अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली आहे. 1 फेब्रुवारी 2021 रोजी बजेट सादर केलं जाईल. लोकसभा सचिवालयानुसार, दोन भागांमध्ये असणारं हे बजेट सेशन 8 एप्रिल 2021 पर्यंत असणार आहे. 29 जानेवारीपासून बजेट सत्राचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत असेल. अर्थसंकल्प सादर करताना सामान्यांसाठी विविध घोषणा केल्या जातील, ज्याचा थेट परिणाम त्याच्या आयुष्यावर होणार आहे


2. या एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत - 1 फेब्रुवारीपासून पीएनबी ग्राहक नॉन-ईएमव्ही एटीएम एटीएम मशीन्समधून (Non-EMV ATM) कॅश काढू शकणार नाहीत. PNB बँकेने अधिकृत ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, 'फसवणुकीपासून वाचण्यासाठी ग्राहकांना पीएनबी नॉन ईएमव्ही एटीएम मशीन्समधून 1 फेब्रुवारी 2021 पासून व्यवहार (वित्तिय किंवा गैर-वित्तिय) करण्यापासून प्रतिबंधत केलं जाईल. गो डिजिटल.. गो सेफ!'


3. एलपीजी गॅस सिलेंडर किंमती - दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्यांकडून एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये (LPG Gas Cylinder Price) बदल करण्यात येतो. जानेवारी महिन्यात या किंमतीमध्ये कोणताही बदल झाला नव्हता. पण त्याआधी डिसेंबर महिन्यात LPG चे दर 2 वेळा बदलले होते. तेल कंपन्यांकडून घरगुती आणि कमर्शिअल एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल केला जातो.


4. PMC बँकेसाठी ऑफर देण्याची डेडलाइन - पीएमसी बँक अॅडमिनिस्ट्रेशनने बँकेची पुन्हा एकदा उभारणी करण्यासाठी गुंतवणूकदारांकडून ऑफर घेण्यासाठीची डेडलाईन 1 फेब्रुवारी निश्चित केली आहे. काही गुंतवणूकदार Centrum Group-BharatPe, यूकेतील कंपनी Liberty Group ने एकत्र येत ऑफर दिली आहे.