भूदान चळवळीचे संस्थापक आचार्य विनोबा भावे यांनी 1934 मध्ये परमधाम आश्रम उभारले होते. देशभरातून दररोज शेकडो पर्यटक तथा अनुयायी येथे भेट देतात. आश्रमाच्या बांधकामादरम्यान केलेल्या उत्खननात इ.सन 250 ते इ.सन 1200 च्या कालखंडातील अनेक मूर्ती आणि शिल्पे आढळून आली, जी आश्रमात प्रदर्शित केली आहेत. शिल्पांमध्ये गंगा देवीची शिल्पे, महाभारत आणि रामायण यातील दृश्ये दर्शविणाऱ्या शिल्पांचा समावेश आहे. आश्रम परिसरात प्राचीन शिवमंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग वाकाटक कालखंडातील असल्याचे इतिहासकार सांगतात. आश्रमाजवळ धाम नदीवर बांध आहे. पर्यटकांना येथे बसून नदी प्रवाहाचा आनंद घेता यावा यासाठी येथे मोठे खांब व त्या सोबतच गोल घुमट उभारले आहे. पर्यटक इथं आल्यावर पाण्यात पोहण्याचा देखील आनंद घेतात.