वर्ध्यात सेवाग्राम विकास मॉडेल अंतर्गत शहराचे सुशोभिकरण करण्यात आले. स्थानिक मुख्य पोस्ट ऑफिस येथे असलेल्या झाशी राणी चौकाच्या सुशोभिकरणासाठीही मोठा निधी खर्च करण्यात आला. शहरातील चौकांत असणारे अतिक्रमण हटवून चौक रिकामा करण्यात आला. तसेच त्याचे सुशोभिकरण करण्यात आले. चौकात सुशोभिकरणासाठी बांधकाम करण्यात आले. तसेच झाशी राणीच्या पुतळ्याभोवती झाडे लावण्यात आली. आता या लाखो रुपये खर्चून केलेल्या सुशोभीकरणाला ग्रहण लागले आहे. देखभालीकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने सुशोभीकरण उद्ध्वस्त झाले आहे. सध्या या पुतळ्यासमोर ठिकठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. एवढेच नाही तर काही राजकीय पक्षांनी कॅम्पसमध्येच त्यांची कार्यालये थाटली आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. तसेच अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे. झाडे लावण्याच्या उद्देशाने चौकाचौकात बांधकाम करण्यात आले. सुरुवातीला निधी खर्च करून झाडे लावली. मात्र देखभालीअभावी सर्व सुकून गेली. चौकाचौकात नगर परिषद प्रशासनाकडून स्टीलची डस्टबिन बसवण्यात आली आहे. मात्र या डस्टबिनमध्येच कचरा जाळला जातो, त्यामुळे डस्टबिन खराब झाली आहेत. लाखो रुपये खर्चून शहराचे सुशोभिकरण केले. मात्र, प्रशासनाच्या दूर्लक्षामुळे त्याचे विद्रुपीकरण होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.