

मोहन जाधव, 08 नोव्हेंबर : पुणे-महाड एसटी बसला महाड हद्दीत वाघजाई घाटामध्ये आंबेनळी बस दुर्घटनेसारखा अपघात थोडक्यात टळला. एसटी बसचालक मोहन बांदल यांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला आहे.


खराब रस्त्यामुळे वळणावर बसचा ताबा राखण्यात चालकाला यश आल्याने गाडीतून प्रवास करणारे सुमारे 76 प्रवासी सुखरुप बचावल्याची प्राथमिक माहिती महाड आगारातून देण्यात आली आहे.


प्राथमिक माहितीनुसार सकाळी आठ वाजता भोर आगारातून एसटी बस (एमएच 14/ बीटी 3847) चालक मोहन बांदल 76 प्रवाशांना घेऊन महाड दिशेने रवाना झाले होते.


बाराच्या सुमारास वाघजाई घाटामध्ये बस आली असताना वाघजाई मंदिरापासूनच्या महाड हद्दीतील दुसऱ्या वळणावर आली असता खराब रस्त्यामुळे गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याचे चालक मोहन बांदल यांच्या लक्षात आले.


चालक मोहन बांदल यांनी ब्रेक लावल्याने बस दरीच्या टोकावर जाऊन थांबली. या बसमधून 76 प्रवाशी प्रवास करीत होते.