शुक्रवार 12 फेब्रुवारी - वानवडी पोलिसांना मृत पूजा चव्हाण मृत्यूशी संबंधित काही ऑडिओ क्लिप्स मिळाल्या. ज्यामध्ये दोन पुरूषांचा आवाज होता. यावरुन कळालं की, पूजाच्या आत्महत्या करणार असल्याची माहिती अगोदर काही लोकांना होती. हे ऑडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडीच्या एका नेत्याचा हात असल्याचा दावा सोशल मीडियात करण्यात आला. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीची मागणी केली.
13 फेब्रुवारी- 6 pm पूजा चव्हाण हिचा पोस्ट मॉर्टेम रिपोर्टही समोर आला आहे. यानुसार पूजाच्या डोक्यावर आणि मणक्याला जखम असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. इमारतीवरुन पडल्यानंतर तिच्या डोक्यावर व मणक्याला मार लागला व त्यात तिचा मृत्यू झाला, असं सांगण्यात आलं. मात्र हा अपघात होता की आत्महत्या की घातपात याचा नेमका खुलासा झालेला नाही.
13 फेब्रुवारी 7.20 pm- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडलं आणि चौकशीचं आश्वासन दिलं. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, जे सत्य आहे ते बाहेर येईलच. त्यानंतर ज्यांच्यावर कारवाईची गरज आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या संदर्भात सखोल चौकशी केली जाईल. पण गेले काही दिवस काही महिने...एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्नं केला जातोय...असाही प्रयत्नं होता कमा नये आणि सत्यही लपवण्याचा प्रयत्न होता कामा नये,'
15 फेब्रुवारी : व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील 'तो' आवाज माझ्या मुलाचा नाही, असा दावा अरुणच्या आईने केला होता. अरुणची आई मीराबाई सुभाष राठोड यांनी याबाबत खुलासा केला असून मीराबाई यांनी त्या ऑडिओ क्लिप मधील संभाषण हे अरुण राठोड व कथित मंत्री यांचे नसल्याचे म्हटले. सध्या अरुण कुठे आहे हे त्याच्या आईला देखील माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.
23 फेब्रुवारी- पूजा चव्हाण प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वन, भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड अखेर 15 दिवसांनंतर समोर आले. पोहरागड याठिकाणी त्यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळाले. यावेळी त्यांना समर्थन देण्यासाठी जमलेल्या समर्थकांवर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला.
25 फेब्रुवारी- वनमंत्री संजय राठोड हे 23 तारखेला शक्तीप्रदर्शन करत पोहरादेवी इथं दाखल झाले. वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी महंतांना नोटीस बजावल्या होत्या. मात्र तरीही बंजारा बांधव हजारोंच्या संख्येने पोहरादेवीला आल्यामुळं कोरोनाची भीती वाढली. याठिकाणी कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. 22 तारखेला 30 नागरिकांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये महंत यांच्या कुटुंबातील 4 जणांसह 8 जण पॉझिटिव्ह आले होते
26 फेब्रुवारी : आता पूजाचं अख्खं कुटुंबच महाराष्ट्रासमोर आलं. त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. 'माझ्या पोटचा गोळा गेला...माझी मुलगी कशी होती हे मला माहीत आहे...ती धाडसी होती...मात्र तिची आता बदनामी थांबवा...पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतील,' असं म्हणत पूजा चव्हाण हिच्या आईनं माध्यमांसमोर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुलीविषयी होत असलेल्या चर्चेमुळे आईला वेदना होत असून त्याच अश्रूरुपाने बाहेर पडल्याचंही पाहायला मिळालं. तर तिच्या बहिणीने देखील पूजाच्या आत्महत्येविषयी शंका उपस्थित केली.
27 फेब्रुवारी: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण उचलून धरणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात एसीबीने 2016 च्या एका प्रकरणात गुन्हा दाखल केला. हा सारा प्रकार सूडबुद्धीने केला जात असल्याची टीका भाजपकडून केली जात आहे. दरम्यान चित्रा वाघ यांनी 27 फेब्रुवारीला नाशिकमध्येही हा मुद्दा उचलून धरला.
28 फेब्रुवारी- दुपारी 2.45 च्या सुमारास- पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणी अखेर शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे सुपुर्द केला आहे. पण चौकशी झाल्यावर राजीनामा स्वीकारावा अशी विनंती संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
28 फेब्रुवारी: राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांच्याकडे सुपुर्द केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा मंजूर केला आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला मोठा झटका मानला जात आहे.