

मुंबई, 25 आॅक्टोबर : निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वाऱ्यांची दिशा बदलताना पाहायला मिळतीय. मनसेला आघाडीत घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रयत्नाचा नवा अंक आज पुन्हा समोर आला आहे.


औरंगाबादेतून निघालेल्या एकाच विमानात राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रवास केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.


राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर होते. दौरा संपवून राज ठाकरे औरंगाबादेत पोहोचले. औरंगाबाद विमानतळावरून विमानाने राज ठाकरे मुंबईला येणार होते. तेव्हा शरद पवारही याच विमानाने प्रवास करत होते.


विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांची जागा अगदी अजूबाजूला आली हे विशेष...त्यामुळे काय तासभराच्या प्रवासात दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली.


शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यातील राजकीय मैत्री सर्वश्रूत आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात शरद पवार आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. पुण्यात जागतिक मराठी अकादमीतर्फे 'शोध मराठी मनाचा' या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेतली होती. ही मुलाखत प्रचंड गाजली.


फेब्रुवारीतील या मुलाखतीनंतर शरद पवार आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आले. विमानामध्ये दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याविषयी तर्कवितर्कांना उधाण आलंय.


बुलडाण्यातील चिखली इथं भारतभाऊ बोंद्रे यांच्या ७५व्या वाढदिवशी कार्यक्रमाला पवारांनी हजेरी लावली. यावेळी व्यासपीठावर रावसाहेब दानवे उपस्थितीत होते.