संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून भावनिक ट्विट केलं आहे. राजीव सातव तू हे काय केलंस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. तुझं अचानक जाणं खूप वेदनादायी आणि भयंकर आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी आपण व्हिडीओ कॉलवरून संवाद साधला होता. त्यावेळी तुझी विजयी भावमुद्रा आजही डोळ्यासमोर आहे. तू कोरोनातून बरा होशील, अशी आशा होती. आता कोणत्या शब्दांत तुला श्रद्धांजली वाहू... अशा शब्दांत खासदार राऊत यांनी राजीव सातव यांच्याबद्दल भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
खरंतर, खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अखेर उपचाराअंती 10 मे रोजी त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे लवकरच राजीव सातव यांना रुग्ण्यालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण, आता अचानक राजीव सातव यांची प्रकृती खालावली होती.
राजीव सातव यांच्या निधनाबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटलं की, काँग्रेसचे खासदार आणि आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झालं. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे. त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते.