सैन्याच्या शौर्याला मराठमोळ्या डॉक्टरचा सलाम, सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी अभिमानास्पद निर्णय
समाजातील प्रत्येक व्यक्ती सैन्यात असलेल्या जवानांसाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि हुतात्मा जवानांच्या परिवाराकरता काहीतरी देणं लागतो....प्रतिनिधी प्रविण मुधोळकर यांचा रिपोर्ट


जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी देशपातळीवरून मदतीचा ओघ सुरू आहे. त्यामध्ये सामान्य जनतेसोबतच सिनेकलाकार, क्रिकेट खेळाडू यासह विविध क्षेत्रात नावलौकिक करणाऱ्या मान्यवरांनी मदत देऊ केली आहे.


नागपूर शहरातील डॉक्टर वैशाली अटलोए यांनीदेखील सैन्यातील जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना आजन्म उपचार नि:शुल्क देऊ केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.


देशाच्या सुरक्षेसाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांसह प्रत्येक देशवासीयांच्या मनावर मोठा आघात झाला. शहीद जवानांच्या कुटुंबियांवरही मोठं संकट कोसळलं आहे.


अशा परिस्थितीत समाजाने हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे.


नागपूरच्या प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉ. वैशाली अटलोए यांनी त्यांच्या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सैन्यातील जवानांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासह हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना आजन्म उपचार मोफत देऊ केलेला आहे.


कुठल्याही प्रकारचे शुल्क देऊ नये कारण त्यांनी रुग्णालयाच्या शुल्कापेक्षाही कितीतरी जास्त शुल्क देशसेवेकरता मोजलेला आहे.


सीमेवर लढतानादेखील आपल्या जीवाची बाजी लावत आपले जवान प्राणाचे बलिदान देतात. तेव्हा अशा जवानांसाठी शुल्क माफ करणं, हा अगदी छोटासा प्रयत्न आहे असं डॉक्टर वैशाली म्हणाल्या.


समाजाने आधार दिल्यास सैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांचं दुःख विसरायला अशी का होईना, मदत होणार आहे. एवढेच नाही तर देशाच्या कुठल्याही भागातील सैनिकांना निशुल्क उपचार देण्याची तयारी डॉक्टर वैशाली यांनी दाखवली आहे.


जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांना नागपुरात येणं शक्य नसेल तर त्यांनी इंटरनेटवरून त्रिशा आयुर्वेदिक हॉस्पिटलचा पत्ता घेऊन किंवा फोन नंबर घेऊन संपर्क केल्यास फोनवरूनदेखील त्यांना उपचार उपलब्ध करून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.


समाजातील प्रत्येक माणसाने सैन्यात असलेल्या जवानांसाठी त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि हुतात्मा जवानांच्या परिवाराकरता काहीतरी देणं लागतो. याचं भान ठेवून सढळ हाताने मदत केली पाहिजे, असं आवाहन यावेळी डॉ. वेशाली यांनी केलं.