

गेल्या 4 दिवसांपासून मुंबई शहर आणि परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या तिन्ही लोकल सेवा बंद पडली आहे.


गेली 3 दिवस उशीरा धावणाऱ्या लोकल आज बंद करण्यात आल्या आहेत. मुंबई परिसरात आणखी 2 दिवस असाच पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.


पावसाचा जोर आणि लोकल सेवा बंद पडल्यामुळे राज्य सरकारने मुंबईतील सर्व सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना तसेच शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे.


मध्य रेल्वेची वाहतूक पाहटेपासून बंद झाली आहे. रेल्वे प्रशासनाने ठाणे ते मुंबई लोकल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी रुळावर पाणी साचल्यामुळे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच मध्य रेल्वेच्या हर्बर मार्गावरील सेवा देखील विस्कळीत झाली आहे.


नवी मुंबईत देखील सकाळपासून पावसाला सुरुवात झाल्याने हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. डोंबिवली ते ठाणे हे स्लो लोकलने वीस मिनिटात कापले जाणारे अंतर कापण्यासाठी दीड ते दोन तास लागत आहेत. मध्य रेल्वेच्या सर्व लोकल्स ठाण्यापर्यंत मुंगीच्या गतीने जात असून त्यापुढे पुढील सूचना मिळेपर्यंत लोकलसेवा बंद ठेवण्यात आली आहे. मुंबईतल्या लोकल सेवेला पावसाने ब्रेक लावला आहे.


पश्चिम रेल्वेची अवस्था मध्य रेल्वेसारखीच झाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरची लोकलसेवा 1 तास उशिराने सुरू आहे. नालासोपारा आणि वसई या भागात प्रचंड पाऊस पडतो आहे. तसेच पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्येही पाऊस पडत असल्याने त्याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या सेवेवरही झाला आहे. इतकंच नाही तर हार्बर रेल्वे मार्गावरही पावसाचा परिणाम झाला आहे.


काल उशिराच्या शिफ्टमध्ये काम करून घरी परतणाऱ्यांना आणि आज सकाळी लवकर कामावर जाण्यासाठी घर सोडलेल्या सगळ्यांनाच लोकल सेवा विस्कळीत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो आहे.


पावसाळा सुरू होण्याआधी नालेसफाई झाली, यंदा मुंबईची तुंबई होणार नाही, असे दावे केले जातात. मात्र मुंबईत अशी वेळ येतेच की ज्यामुळे तिचा वेग मंदावतो. गेल्या महिन्याभरापासून पावसाने ओढ दिली. त्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे प्रचंड पाऊस झाल्याने लोकलसेवा ठप्प झाली आहे.


कल्याणमधील दुर्गाडी परिसरात नॅशनल उर्दू शाळेची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि एक लहान मुलाचा समावेश आहे. या दुर्घटनेत एक महिला जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.


चार दिवसापासून सलग पडणाऱ्या पावसामुळे मुंबईची लाईफ लाईन असण्याऱ्या मुंबई लोकलवर खूप मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे लोकल बंद पडल्या आहेत.


मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे (डबेवाला संघटनेचे) अध्यक्ष श्री.उल्हास मुके यांनी आज दिनांक 2 जुलै 2019 रोजी डबेवाल्यांची सेवा बंद राहील व उद्या दिनांक 3 जुलै 2019 पासून सेवा नियमित पणे सुरू राहील असे सांगितले.