जालना शहरातील पोलिस मुख्यालयाच्या परिसरात मुख्य जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
2/ 9
आता जलवाहिनी दुरुस्तीसाठी शनिवारचा पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे जुना जालन्यातील बहुतांश ठिकाणी शनिवारचा पाणीपुरवठा बंद राहील. जलवाहिनी वेळेत दुरुस्त झाली तर रविवारी सकाळपासून या भागातला पाणीपुरवठा सुरू होईल.
3/ 9
शहरातील सर्व्हे क्रमांक 488 येथे सध्या मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरू आहेत. त्यासाठी जेसीबी आणि पोकलेनद्वारे अनेक ठिकाणी ओढ्यांचे आणि छोट्या नाल्यांचे खोलीकरण केले जात आहे.
4/ 9
शुक्रवारी जेसीबीद्वारे खोलीकरणाचे काम सुरू असताना 600 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. ही मुख्य जलवाहिनी असल्याने त्यातून जवळपास तासभर लाखो लिटर पाणी वाया गेले.
5/ 9
पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी कारागृह परिसरातील जलकुंभातून पाणी बंद केल्यानंतर ही गळती थांबली.
6/ 9
शनिवारी माऊलीनगर, सोरटीनगर, नूतन वसाहत, पोलिस वसाहत, समर्थनगर, शिवनगर, योगेशनगर आदी भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
7/ 9
जलकुंभात उपलब्ध असलेल्या पाण्यातून ज्या भागात शक्य आहे, तिथे पाणीपुरवठा केला जाऊ शकेल.
8/ 9
जालन्यातील मुख्य जलवाहिनीचा जोड जालना आणि छत्रपती संभाजीनगर शहरात उपलब्ध नाही. हा जोड फक्त नांदेड येथेच मिळतो. त्यामुळे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना तातडीने जोड उपलब्ध करून घेण्यासाठी नांदेडला रवाना केले आहे.
9/ 9
शनिवारी हा जोड आणि आवश्यक दुरुस्तीचे साहित्य शहरात पोहोचल्यानंतर तातडीने काम सुरू होईल, अशी माहिती मिळत आहे.